Beed : खत विक्रीत अनियमितता, माजलगावात कृषी कर्यालयालाच टाळे..!
हंगाम सुरु होण्यापूर्वीच यंदा रासायनिक खतांचा तुटवडा भासणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्याचाच फायदा आता विक्रेत्ये घेताना दिसत आहेत. विशेषत: बीड जिल्ह्यात हे प्रकार वाढत असून खताच्या ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. शेतकरी आर्थिक संकटात असतानाच अशाप्रकारे लूट केली जात आहे.
बीड : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन (Beed District) बीड जिल्ह्यात कायमच आक्रमक भूमिका घेतली जाते. आता खरीप हंगामाची लगबग सुरु असतानाच (Chemical Fertilizer) रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र, कृषी अधिकाऱ्यांच्या संगणमतानेच विक्रेत्यांचे हे धाडस होत असल्याचा आरोप करीत शेतकरी कामगार पक्षाने माजलगाव येथील (Agricultural Office) कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र भरारी पथकाकडून खत-बियाणे विक्रीत अनियमितता आढळून आल्यास कारवाई केली जाते पण बीड जिल्ह्यात वेगळेच चित्र असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीलाच याबाबत आवाज उठवल्यास भविष्यात असे प्रकार होणार नाहीत असे मत शेकापचे नारायण पाटील यांनी सांगितले आहे.
चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री
हंगाम सुरु होण्यापूर्वीच यंदा रासायनिक खतांचा तुटवडा भासणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्याचाच फायदा आता विक्रेत्ये घेताना दिसत आहेत. विशेषत: बीड जिल्ह्यात हे प्रकार वाढत असून खताच्या ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. शेतकरी आर्थिक संकटात असतानाच अशाप्रकारे लूट केली जात आहे. त्यामुळे वेळीच यावर निर्बंध लादले गेले नाहीत तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अशा वेळी कृषी विभागाने योग्य ती भूमिका घेऊन कारवाई करणे करणे अपेक्षित आहे.
खत विक्रेत्ये अन् अधिकाऱ्यांमध्ये संगणमत
खत किंवा बियाणे विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करता यावी यासाठी तालुका निहाय भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यासह मंडळाच्या ठिकाणी असणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर करडी नजर असणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वकाही ज्ञात असूनही कारवाईकडे कानडोळा केला जात असल्याचा आरोप शेकापच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे रासायनिक खताच्या विक्रीमध्ये काय सुधारणा होणार का हे पहावे लागणार आहे.
अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार..
हंगामाच्या सुरवातीलाच खत- बियाणे यांच्या विक्रीतील अनियमिततेवर कारवाई झाली तर शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. मात्र, जिल्ह्यात कृषी अधिकारीच संगणमत करुन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. अशाप्रकारे होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. शिवाय ठरवून दिलेल्या किंमतीमध्ये जर खतांची विक्री झाली नाही तर मात्र, कृषी अधिकाऱ्यांनाच काळे फासणार असल्याचा इशारा शेकाप च्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई संदर्भाक कृषी विभाग कोणती पावले उचलणार हे पहावे लागणार आहे.