Onion Crop : गतवर्षी भरघोस उत्पादन, यंदा मात्र कांद्याचा वांदा, 4 एकरावरील कांद्यावर फिरवला नांगर
खरीप आणि रब्बी हंगामातील मुख्य पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामी पिकातून उत्पादन वाढीचा प्रयत्न केला मात्र, घटत्या दरामुळे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी स्थिती या हंगामी पिकांची झाली आहे. दिवसेंदिवस कांदा काढणी वाढत असताना दुसरीकडे दरात घट ही सुरुच आहे. काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचे लिलाव देखील झालेले नाहीत.
जळगाव : उसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक म्हणून ओळखले जाते पण उसाप्रमाणे या पिकाच्या दराची शाश्वती नाही. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये 35 रुपये किलो असलेला (Onion Rate) कांदा थेट 1 आणि 2 रुपये किलोवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्पन्न तर सोडाच बाजारपेठेत दाखल करण्यासाठी होणारा खर्चही या पिकातून निघणे मुश्किल झाले आहे. गतवर्षी कांदा पिकातूनच भरघोस उत्पादन मिळाल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील विष्णू समाधान इंगळे यांनी तब्बल 4 एकरावर (Onion Market) कांद्याची लागवड केली होती. पण आता कवडीमोल दर असल्याने इंगळे यांनी चक्क कांदा पिकामध्ये नांगर घातला आहे. खरीप पेरणापूर्वी क्षेत्र रिकामे करुन इतर पीक घेता येईल म्हणून कांदा पीक वावरातून बांधावर टाकले आहे. सबंध राज्यात कांद्याच्या मागणीत घट आणि उत्पादनात वाढ झाल्याने ही अवस्था झाली आहे.
कांदा 1 ते 2 रुपये किलो
खरीप आणि रब्बी हंगामातील मुख्य पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामी पिकातून उत्पादन वाढीचा प्रयत्न केला मात्र, घटत्या दरामुळे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी स्थिती या हंगामी पिकांची झाली आहे. दिवसेंदिवस कांदा काढणी वाढत असताना दुसरीकडे दरात घट ही सुरुच आहे. काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचे लिलाव देखील झालेले नाहीत. त्यामुळेच कांदा हे लहरीपणाचे पीक असल्याचे संबोधले जाते.
अधिकच्या खर्चपेक्षा नांगरण परवडली
बाजारपेठेत दिवसेंदिवस कांद्याचे दर घटत असताना इकडे काढणी, छाटणी, वाहतूक यावर खर्च करण्यापेक्षा कांदा मोडलेला बरा म्हणून विष्णू इंगळे यांनी 4 एकरावरील पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवणे पसंत केले आहे. यामुळे 4 एकाराचे क्षेत्र रिकामे होईल आणि खरिपात इतर पिकाचे उत्पादन घेता येईल हा उद्देश ठेवून त्यांनी हे पाऊल उचलेले आहे.
सर्वकाही महाग, शेतीमालाचीच परवड
काळाच्या ओघात सर्वकाही महाग होत आहे. दिवसाकाठी खाद्यतेलाच्या किंमती वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढत आहेत असे असताना मात्र, शेतीमालाला कवडीमोल दर मिळत आहे. केवळ कांदाच नव्हे तर कलिंगड, खरबूज, ज्वारी, हरभरा या शेतीमालाच्या दरातही घटच झालेली आहे. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारपेठेतील दराची अनिश्चितता यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे.