Ajit Pawar : नुकसानीचा आढावा घेऊन अजित पवार निघाले मुंबईला, शेतकऱ्यांचा प्रश्न निकालीच लावणार..!
राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी पंचनामेही नाहीत. प्रति हेक्टर 75 हजाराची मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी यापूर्वीच केली आहे. विदर्भानंतर त्यांनी मराठवाड्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सध्याचे राजकारण आणि ग्राऊंडवरची स्थिती यामध्ये खूप मोठा फरक आहे.
औरंगाबाद : (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Kharif Crop) खरीप हंगामातील पिकांसह राज्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि ग्रामीण भाग पिंजून नुकसानीची पाहणी केली आहे. रविवारी ते मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करुन सोमवारी मुंबईत दाखल होत आहेत. या दरम्यानच्या काळात त्यांनी ठिकठिकाणी नुकसानीचा आढावा घेतला असून शेतकऱ्यांच्या समस्या ते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहे. राज्यातील स्थिती विदारक आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर जे संकट ओढावले आहे ते मदतीच्या माध्यमातून दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान
राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी पंचनामेही नाहीत. प्रति हेक्टर 75 हजाराची मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी यापूर्वीच केली आहे. विदर्भानंतर त्यांनी मराठवाड्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सध्याचे राजकारण आणि ग्राऊंडवरची स्थिती यामध्ये खूप मोठा फरक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि तेही भरीव अशी केली तरच शेतकऱ्यांवरील संकट दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्तबगार तरीही..
सध्या राज्याचा कारभार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच हाकत आहेत. ते कितीही कर्तबगार असले तरी आपले राज्य मोठे असल्याने शक्य नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करुन जबाबदारी पालकमंत्र्यांवर दिली तर अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. राज्यात केवळ एकच समस्या आहे असे नाही. दिवसागणिस त्याचे स्वरुप बदलत नाही. मात्र, मुंबईत बसून लक्षात येणार नाही तर स्थानिक पातळीवर फिरुन, शेतकऱ्यांशी संवाद साधूनच त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे.
महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नाही
नव्या सरकारची स्थापना होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. याची जाणीव सरकारला असणे गरजेचे आहे. आता कुठे हालचालींना वेग आला असून दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.