Eknath Shinde : पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी भर सभेत शेतकऱ्यांना काय दिला शब्द..?
सबंध राज्यात खरिपाची पेरणी होताच पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे पावसाचा परिणाम थेट पिकांच्या वाढीवर झाला असून अजूनही पिके ही पाण्यातच आहेत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप हंगामावरच अवलंबून आहे. असे असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
मालेगाव : राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पेरणी होताच पावसाने हाहाकार घातला होता. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे प्रमाण घटले आहे. त्या दरम्यानच कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आता पंचनामे 100 टक्के पूर्ण झाले असून लवकरच मदतीची घोषणा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ अडचणीचा आहे. आणि अशा काळात सरकार जगाच्या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानीचे चित्र स्पष्ट आहे आता केवळ एका बैठकीत मदतीचे स्वरुप कसे राहील हे सांगितले जाणार असल्याचे त्यांनी मालेगावात म्हटले आहे.
खरीप पिकांचे नुकसान
सबंध राज्यात खरिपाची पेरणी होताच पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे पावसाचा परिणाम थेट पिकांच्या वाढीवर झाला असून अजूनही पिके ही पाण्यातच आहेत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप हंगामावरच अवलंबून आहे. असे असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता पंचनाम्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नुकसान कितीही असले तरी भरपाईबाबत कोणतीही हायगई केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
विरोधकांनाही दिले उत्तर
ऐन नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री हे दौरे करण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या ह्या बांधावर गेल्याशिवाय लक्षात येत नाहीत. त्यामुळे उंटावरुन बसून शेळ्या हाकण्यामध्ये काही अर्थ नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला होता. तर त्यांना बांधावर पोहचण्यास वेळ झाला होता. त्यांच्यापूर्वी आम्ही नुकसान पाहणी केली होती. एवढेच नाहीतर पंचनाम्याचे आदेशही पहिल्याच पाहणीच्या वेळी दिले होते. त्यामुळेच ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 100 पंचनामे पूर्ण झाले असल्याने आता मदतीची घोषणा करण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
सध्याचं सरकार हे शेतकऱ्यांचे
सध्याचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कसे वाऱ्यावर सोडले जाईल. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल अशी मदत केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपाकडे लक्ष न देता शेतकऱ्यांचे हित कशामध्ये याचा अभ्यास करुन मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासोबतच राज्याचा विकास कसा होईल यावरच लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.