Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?
गेल्या महिन्याभरात सोयाबीनला शाश्वत दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दराला घेऊन समीकरणे आहेत ती फोल ठरत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनला 8 हजाराचा दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. दिवाळीनंतर काही दिवस शेतकऱ्यांनी केलेल्या साठवणूकीचा फायदा झाला मात्र, गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचा अंदाज चुकीचा ठरत आहे.
लातूर : गेल्या महिन्याभरात (Soybean) सोयाबीनला शाश्वत दर मिळालेला नाही. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांची दराला घेऊन समीकरणे आहेत ती फोल ठरत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनला 8 हजाराचा दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. दिवाळीनंतर काही दिवस शेतकऱ्यांनी केलेल्या साठवणूकीचा फायदा झाला मात्र, गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचा अंदाज चुकीचा ठरत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये (Soybean Rate) सोयाबीनच्या दरामध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करावे असा सवाल उपस्थित होत आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी हे शेतीमालाची साठवणूक करीत आहेत.
सोयाबीन पुन्हा 6 हजारावर
डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला सोयाबीनचे दर हे 6 हजारावर गेले होते. त्या दरम्यानच्या काळात सोयापेंडची आयात होणार असल्याची चर्चा होती. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला होता. मात्र, आता सोयापेंड हे आयात होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तसा निर्णय झाला असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. असे असतानाही सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण होत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात तब्बल 200 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आठवडाभर काय होणार याची चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
घटत्या दराची काय आहेत कारणे?
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे एकतर स्थिर आहेत किंवा त्यामध्ये घट होत आहे. सोयाबीनची मागणी थंडावलेली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योजक, व्यापारी हे साठाबंदीचा निर्णय मागे घेऊन देखील सोयाबीन खरेदीकडे लक्ष देत नाहीत. यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे भविष्यातही सोयाबीनची टंचाई भासणार नाही ह्याचा विचार बाजारपेठेत होत असल्याने कदाचित दरात वाढ होत नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे. मात्र, घटते दर आणि वाढती आवक ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 12 हजार पोत्यांची आवक झाली होती. सोमवारपासून नियमित सोयाबीनचे सौदे आणि बियाणासाठीच्या सोयाबीनचे सौदे हे वेगवेगळे होण्यास सुरवात झाली आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6384 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5800 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6200 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4750, सोयाबीन 6200, चमकी मूग 7200, मिल मूग 6150 तर उडीदाचा दर 7300 एवढा राहिला होता.