राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका; कुणाला धक्का, तर कुणी उधळला गुलाल
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागत आहेत. काही ठिकाणी उद्या निकाल जाहीर केले जातील. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
मुंबई : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. काही बाजार समितीचे आज निकाल लागले. तर काही बाजार समितींचे चित्र उद्या स्पष्ट होईल. अशात कोणाचा यश मिळाले. आणि कुणी गुलाल उधळला, याचा हा थोडक्यात आढावा. चंद्रपूर जिल्हातील बारा बाजार समितीसाठी निवडणुका पार पडल्या. नऊ बाजार समितीचा निकाल रविवारला जाहीर झाला होता. यात चार बाजार समितीवर काँग्रसने विजय मिळावला तर दोन बाजार समितीवर भाजप विजयी झाला होता. दोन ठिकाणी भाजप-काँग्रेस युतीने विजय मिळवला. आज ( रविवार ) जिल्हातील पोंभुर्णा, गोंडपिपरी, भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी झाली. पोंभुर्णा येथील निकाल धक्कादायक ठरला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविलं. महाविकास आघाडी समर्पित पॅनलला बारा जागावर विजय मिळाला. तर भाजप समर्पित पॅनलला केवळ सहा जागावर विजय मिळवीता आला आहे. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत अपयश मिळालं होतं. आता मंत्री मुनगंटीवार यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभं असलेल्या पोंभुर्णा येथे मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला आहे.
वरुडमध्ये बोंडे यांची एकहाती सत्ता
अमरावतीच्या वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीवर खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या भाजप-काँग्रेस प्रणीत पॅनलची एकहाती सत्ता आली. १८ पैकी १५ जागांवर बोंडे यांच्या पॅनलचा विजय झाला. तर राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव झाला. सहकार क्षेत्रात भाजपची जोरदार मुसंडी आहे. वरुड येथे कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून जल्लोष केला.
चांदुरबाजारमध्ये बच्चू कडू यांचा विजय
चांदुरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांचा दणदणीत विजय झाला. चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर बच्चू कडू यांची एकहाती सत्ता आली. चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेना आणि भाजपचा धुव्वा उडाला. बच्चू कडू यांच्या पॅनलचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले.
कळंबमध्ये शेतकरी विकास आघाडीचा एकतर्फी विजय
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बाजार समितीवर काँग्रेसचे प्रवीण देशमुख आणि माजीमंत्री वसंत पुरके यांचे पुन्हा वर्चस्व आले. काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीचा 18 जागांवर एकतर्फी विजय मिळवला. भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांना धक्का बसला. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचे सर्व गट एकत्रित येऊनही त्यांना एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला.
मौद्यात सुनील केदार यांचे वर्चस्व
नागपूर जिल्ह्यातील मौदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज मतदान झाले. त्यानंतर निकाल लागला. 18 पैकी 16 जागांवर आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात पॅनल निवडून आले आहे. भाजप समथित 1 सदस्य निवडून आला तर अन्य 1 सदस्य निवडून आला.
लाखांदुरात काँग्रेसची एकहाती सत्ता
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. 18 जागांचा निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसचे 11 संचालक निवडून आलेत. भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस – शिंदे गटाला 7 जागांवर विजय मिळाला. काल झालेल्या निवडणुकीत लाखनी बाजार समितीत भाजपने काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
सांगोल्यात सर्वपक्षीय आघाडीची सत्ता
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीची सत्ता आली. सांगोल्यात शिवसेना, शेकाप, भाजप आणि राष्ट्रवादीची सर्वपक्षीय युती झाली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात बाजार समितीसाठी सर्व पक्ष एकदम ओके होते. सर्वपक्षीय युतीला बंडखोर शेकाप, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आव्हान दिले होते. सोळा जागांवर सर्व पक्ष शेतकरी महाविकास आघाडीचा विजय झाला. यापूर्वी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. बाजार समितीच्या निकालानंतर उमेदवारांचा विजय जल्लोष केला. आमदार शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात बाजार समितीसाठी सर्व पक्षीयांची आघाडी झाली होती.
जयसिंगपूरमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९२.१६ टक्के चुरशीने मतदान झाले. बाजार समितीच्या ११ जागेसाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मतमोजणी निकालानंतर सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास विकास आघाडीने एकतर्फी बाजी मारली तर विरोधी भाजप पुरस्कृत पॅनलचा धुवा उडाला.
धुळ्यात महाविकास आघाडीचा झेंडा
18 पैकी 16 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात विजय मिळवलेल्या काँग्रेस पक्षाने चाळीस वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. भाजपाला अवघ्या दोन जागावर समाधान मानावे लागले. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाचे खासदार सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत आमदार पाटील यांनी संपूर्ण भाजप पॅनेलचा दुवा उडवला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेत हा जनतेचा विजय असल्याचा सांगितले आहे.