Kharif Season : कपाशी बियाणे खरेदीचा ‘श्रीगणेशा’, पावसानेही ‘टायमिंग’ साधले
राज्यात मराठवाडा विभागात कपाशीचे क्षेत्र घटले असले तरी विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, खरीपपूर्व हंगामात लागवड केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या काही वर्षातील निरीक्षणातून ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आल्याने कपाशी बियाणे विक्रीचे वेळापत्रकच ठरविण्यात आले होते. बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे इतर पिकांच तर नुकसान होतेच पण शेतजमिनीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
मुंबई : हंगापूर्वीच (Cotton Crop) कपाशीचा पेरा केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शास आल्यानंतर यंदा 31 मे पर्यंत (Cotton Seed) कपाशी बियाणे विक्रीला बंदी होती. (Agricultural Department) कृषी विभागाच्या या निर्णयामुळे अद्यापही कृषी सेवा केंद्राकडे बियाणे असले तरी त्याची विक्री करता येत नव्हती पण 1 जूनपासून कृषी सेवा केंद्रांना विक्री आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे खरेदीबरोबरच आता शेतकऱ्यांना कपाशीचा पेराही करता येणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कामे उरकली असून गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील विविध ठिकाणी पावसानेही हजेरी लावल्याने खरिपासाठी सर्वकाही पोषक असे वातावरण मानले जात आहे.
यामुळे घेतला होता निर्णय
राज्यात मराठवाडा विभागात कपाशीचे क्षेत्र घटले असले तरी विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, खरीपपूर्व हंगामात लागवड केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या काही वर्षातील निरीक्षणातून ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आल्याने कपाशी बियाणे विक्रीचे वेळापत्रकच ठरविण्यात आले होते. बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे इतर पिकांच तर नुकसान होतेच पण शेतजमिनीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यानुसार विक्री अन्य़था कारवाईची भूमिका कृषी विभागाने घेतली होती. वर्धा जिल्ह्यात काही कृषी सेवा केंद्रांनी अनियमितता केल्याने त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती.
विक्रेत्यांकडून झाला होता विरोध
कृषी विभागाने कपाशी बियाणे विक्रीवर बंदी घातल्याने विक्रेत्यांचे तसेच कपाशी बियाणांच्या विक्रीवर परिणाम झाला होता. शिवाय या निर्णयामुळे शेतकऱ्यांचीही अडचण होणार असल्याचे कारण पुढे करीत विक्रेत्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पण अंतिम निर्णय हा मंत्रिमंडळाचा असणार असा मधला मार्ग काढून कृषी विभागाने विक्रीवर बंदी ही कायम ठेवली. आता 1 जून पासून कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना कपाशी बियाणे हे खरेदी करता येणार आहे. पोषक वातावरणामुळे योग्य वेळी पेरा होईल असा विश्वास कृषी विभागाला आहे.
असे आहे बियाणे विक्रीचे वेळापत्रक
हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री सुरु झाली आहे.