आठवड्याच्या शेवटी पुन्हा धाकधूक : सोयाबीनची विक्री की साठवणूक ? शेतकऱ्यांसमोर प्रश्न कायम
गेल्या 5 दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवक सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेच. आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती.
लातूर : गेल्या 5 दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवक सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा एकदा (Soybean Price) सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेच. आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. गेल्या पाच दिवसांमध्ये 400 रुपयांची वाढ होऊन सोयाबीनचे भाव हे 6 हजार 450 रुपयांवर गेले होते. त्यामुळे (Soybean Arrivals) आवकही सरासरीप्रमाणे होत असताना शुक्रवारी घसरलेल्या दरामुळे संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम होणार आहे.
दरामध्ये चढ-उतार कायम
सोयाबीनचे दर हे काही दिवस स्थिरावले होते. त्यामुळे शेतकरीही साठवणूक केलेल्या साोयाबीन विक्रीच्या तयारीत आहेत. म्हणूनच गेल्या चार दिवसांमध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे. दिवसाकाठी 8 हजार पोत्यांची आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली होती. शिवाय आता उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यावर अणखीन दर खालावतील याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे वाढीव दरात सोयाबीन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला खरा पण आता तो टिकून राहतो की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका दिवसांमध्ये सोयाबनच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आगामी आठवड्याच्या बाजारावर याचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
तुरीच्या खरेदी केंद्राला होणार सुरवात
खरीप हंगामातील तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता हक्काचे खरेदी केंद्र मिळणार आहेत. शनिवारपासून राज्यात 186 ठिकाणी खरेदी केंद्र चालू होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे. आतापर्यंत व्यापारी ठरवतील त्याच दरात तूर विक्री करावी लागली आहे. पण केंद्र सरकारने तूरीसाठी 6 हजार 300 रुपये हमीभाव ठरवलेला आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शनिवारपासून खरेदी केंद्रावर विक्री करुन सरासरीएवढा दर मिळणार आहे. 20 डिसेंबरपासून खरेदी केंद्रावर केवळ नोंदणी केली जात होती. आवश्यक ती कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेतही तूरीचे दर हे हमीभावाप्रमाणेच झाले आहेत. त्यामुळे शेतकरी तूर विक्री कुठे करतात हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6300 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5841 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6300 रुपये क्विंटल, जानकी चना 4600 रुपये क्विंटल, विजय चणा 4600, चना मिल 4500, सोयाबीन 6360, चमकी मूग 7130, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 6911 एवढा राहिला होता.