Auto Sale : ऑटो इंडस्ट्रीजचा ‘कार’नामा! महागाईतही इतक्या चारचाकीची विक्री
Auto Sale : महागाईने कहर केला असतानाही ऑटो सेक्टरने कारनामा करुन दाखवला. जुलै 2023 मध्ये कार विक्रीत आघाडीच्या कंपन्यांनी जोरदार आघाडी घेतली. त्यामुळे या सेक्टरमध्ये आनंदाचे वारे आहे.
नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज (Automotive Industry) नव्या विक्रमाची साक्षीदार ठरली. विविध आघाडीच्या ब्रँड्सने जोरदार विक्री केली. भारतीय बाजारात गेल्या महिन्यात 3.52 लाख कारची विक्री (Car Sales) झाली. महागाईचा वरचष्मा असताना, ईएमआयचे ओझे असताना, व्याज दर चढा असताना हा चमत्कार घडला. वार्षिक आधारावर जुलै महिन्यात विक्रीत 3 टक्के वाढ झाली. तर महिन्याच्या आधारावर 7.4 टक्के वृद्धी दिसून आली. देशात महागाई दिवसागणिक नवनवीन रेकॉर्ड करत असताना कार वृद्धीत होणारा विक्रम अर्थतज्ज्ञांना अचंबित करणारा आहे. भारतीय मध्यमवर्ग सधन होत असल्याचे आणि नवीन मध्यमवर्ग वाढत असल्याचे हे द्योतक तर नाही ना? का यामागे इतर काही कारणे आहेत..
कोणी घेतली आघाडी
मारुती सुझुकीने कार विक्रीत आघाडी घेतली. जुलैमध्ये या कंपनीने 1,52,126 कारची विक्री केली. वार्षिक आधारावर कंपनीने 6.5 टक्के वृद्धी नोंदवली. हुंदाई विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या कंपनीने 50,701 युनिटची विक्री केली. वार्षिक आधारावर हा वृद्धी दर 0.4 टक्के आहे. मासिक आधारावर कंपनीने 1.4 टक्क्यांची वाढ नोंद केली.
कार विक्रीचा आलेख
टाटा मोटर्सने विक्रीत तिसरे स्थान पटकावले. कंपनीने महिनाभरात 47,630 कारची विक्री केली. वार्षिक आधारावर वृद्धी दर 0.3 टक्के आहे. महिंद्रा पण या स्पर्धेत टिकली. कंपनीने 30.4 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. 36,205 कारची विक्री केली. टोयाटो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या कंपनीचा गेल्या महिन्यातील विक्रीचा आकडा 20,759 होता.
कियासह एमजीला फायदा
विक्रीच्या यादीत किया मोटर्स सहाव्या स्थानावर आहे. या कंपनीने 20,002 कारची विक्री केली. कंपनीने वृद्धी दराच्या आसपास कामगिरी बजावली. तर एमजी मोटर्सने 5,012 युनिटची विक्री केली. वार्षिक आधारावर कंपनीचा वृद्धी दर 24.9 टक्के आहे.
वृद्धी दर गाठण्याचे स्वप्न अपूर्ण
होंडा आणि स्कोडाला या काळात थोडा फटका बसला. वार्षिक आधारावर या कंपन्यांना कामगिरीत अजून सुधारणा करण्याची संधी आहे. होंडाने गेल्या महिन्यात 4,864 युनिट तर स्कोडाने गेल्या महिन्यात 4,207 कारची विक्री केली. फोक्सवॅगनने वार्षिक आधारावर 30.8 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. कंपनीने 3,814 कारची विक्री केली.
मॉडलला धक्का
कंपन्यांच्या काही ब्रँडसला मोठा धक्का बसला. त्यांच्या विक्रीत जोरदार घसरण झाली. या कारच्या ब्रँडिंगसाठी मोठा जाहिरात खर्च करण्यात आला. पण वार्षिक आधारावर त्यांचे पानिपत झाले.
या सेगमेंटला धक्का
पूर्वी कमी किंमतीतील हॅचबॅकला मध्यमवर्गातून पसंती मिळत होती. त्यांची विक्री जोरात होती. पण या सेंगमेंटला धक्का बसला आहे. कमी किंमतीतील हॅचबॅक कारला ग्राहकांनी नकार दिला आहे. फुट एरिया, आसान व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, कमी क्षमता या आणि इतर अनेक कारणांमुळे या सेगमेंटकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.