पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ तेलावर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol-Diesel Price) त्रस्त असलेल्या लोकांसाठी येत्या 8 ते 10 दिवसांत सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol-Diesel Price) त्रस्त असलेल्या लोकांसाठी येत्या 8 ते 10 दिवसांत सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फ्लेक्स-फ्यूल इंजन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांना मदत होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) चालना मिळेल. (Decision over flex-fuel engines in 8-10 days, says Nitin Gadkari)
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोटरी जिल्हा परिषदेला (Rotary District Conference 2020-21) संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पर्यायी इंधन इथेनॉलची (Ethanol) किंमत प्रति लीटर 60-62 रुपये इतकी आहे तर देशाच्या अनेक भागांत पेट्रोलची किंमत (Petrol Price) प्रति लीटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल वापरुन भारतीयांना प्रति लीटर 30 ते 35 रुपयांची बचत करता येईल.
फ्लेक्स-फ्यूल इंजिन उत्तम पर्याय ठरेल
गडकरी म्हणाले की, मी परिवहन मंत्री आहे. मी उद्योगाांना एक आदेश देणार आहे की वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिनच नसेल, तर फ्लेक्स-फ्यूल इंजिनदेखील असतील, जिथे लोकांना 100 टक्के कच्चे तेल वापरण्याचा पर्याय असेल. केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले, मी 8 ते 10 दिवसांत याबाबत निर्णय घेईन आणि ऑटोमोबाईल उद्योगासाठी आम्ही ते (फ्लेक्स-फ्यूल इंजिन) अनिवार्य करू.
या देशांमध्ये फ्लेक्स-फ्यूल इंजिनाचं उत्पादन
ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन तयार करत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना 100% पेट्रोल किंवा 100% बायो-इथेनॉल (Bio-ethanol) वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य
पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईल. केंद्र सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले होते. परंतु आता सरकारने निर्णय बदलला आहे. सरकारला हे लक्ष्य आता 2023 पूर्वी साध्य करायचे आहे.
गडकरी म्हणाले की, सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2014 मध्ये हेच प्रमाण 1-1.5 टक्के इतकं होतं. ते म्हणाले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. कारण आपला देश कॉर्न सरप्लस आहे, आपण शुगर-गहु सरप्लस आहोत, आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाही.
इथेनॉल म्हणजे काय?
इथॅनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार होतं. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.
इतर बातम्या
सर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय
जुलैपासून Maruti Suzuki च्या सर्व गाड्या महागणार, त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी
(Decision over flex-fuel engines in 8-10 days, says Nitin Gadkari)