कियाची ‘ही’ एसयूव्ही मारुतीसारखेच मायलेज देणार, क्रेटा, विटाराला टक्कर देणार?
एसयूव्ही घ्यायची असेल तर थोडं थांबा. कारण, दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी किआ मोटर्स लवकरच भारतात हायब्रीड मॉडेल लाँच करणार आहे. नवीन मॉडेल ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या एसयूव्हीला टक्कर देईल. हायब्रीड पॉवरट्रेनमुळे त्याचे मायलेजही दमदार असणार आहे.

तुमचा एसयूव्ही खरेदी करण्याचा प्लॅन आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या लोकप्रिय एसयूव्हीला टक्कर देणारी किआ सेल्टोस आता लवकरच अधिक मायलेज घेऊन येणार आहे.
किआ मोटर्स सेल्टोसच्या सेकंड जनरेशन मॉडेलवर काम करत आहे. कंपनीने नुकताच खुलासा केला आहे की, ती किआ सेल्टोस हायब्रिड इंजिनसह लाँच करण्याची योजना आखत आहे. सेऊल येथे झालेल्या गुंतवणूकदार मेळाव्यात कंपनीने खुलासा केला की, येत्या काही वर्षांत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह अनेक कार लाँच करणार आहे. भारतात एकूण विक्रीत हायब्रीडचा 25 टक्के आणि ईव्हीचा 18 टक्के समावेश करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
किआ सेल्टोस भारतात 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. लाँचिंगनंतर किआ सेल्टोस ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या एसयूव्हीप्रमाणे अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झाली आहे. याचे कारण कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटला जास्त मागणी आहे. कियाने 2023 मध्ये एसयूव्हीला अधिक फीचर्स आणि अधिक शक्तिशाली इंजिनसह अपडेट केले.




किआ सेल्टोसचे मायलेज किती?
रिपोर्टनुसार, किआ हायब्रिडला सध्याच्या मॉडेलच्या 1.5-लीटर एनए पेट्रोल इंजिनसोबत जोडणार आहे. विजेची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. सध्याच्या 1.5 लिटर एनए पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त पॉवर देण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
हायब्रीड टेक्नॉलॉजीमुळे एसयूव्हीचे मायलेज सुधारण्याची अपेक्षा करता येऊ शकते. मजबूत हायब्रीड मॉडेल 20-25 किमी/लीटरपेक्षा जास्त मायलेज देईल अशी अपेक्षा आहे. सध्या ह्युंदाई क्रेटाचे पेट्रोल मॉडेल 16-18 किमी प्रति लिटर आणि मारुती ग्रँड विटारा हायब्रीड मायलेज 27.97 किमी प्रति लीटर पर्यंत आहे.
कंपनी 6-7 सीटर एसयूव्ही कधी लॉन्च करणार?
नवीन किआ सेल्टोसमध्ये पूर्वीसारखेच 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे सौम्य हायब्रिड असू शकते. परंतु कठोर उत्सर्जन नियमांमुळे कंपनी 1.5 लीटर डिझेल मॉडेल बंद करू शकते. इतकंच नाही तर किआ भारतासाठी सेल्टोससारखी 6-7 सीटर एसयूव्ही देखील तयार करत आहे. यात पेट्रोल हायब्रीड पॉवरट्रेनही दिली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे.
नव्या पिढीतील किआ सेल्टोसच्या डिझाईनमध्ये काही बदल होऊ शकतात, असे वृत्त आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प, नवीन ओआरव्हीएम आणि ड्युअल टोन अलॉय व्हील्स मिळू शकतात.