Petrol Electric Bike | जुन्या पेट्रोल बाईकचे रुपडे बदलणार; इलेक्ट्रिक बाईक होणार
Petrol Electric Bike | जर तुम्ही पण जुन्या पेट्रोल बाईकचा चेहरामोहरा बदलण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच..पेट्रोल बाईक तुम्ही इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलवू शकता. इलेक्ट्रिक बाईकसाठी एक लाख रुपये खर्च करण्यापेक्षा या नवतंत्रज्ञानाच्या आधारे सहज इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलवू शकते.
नवी दिल्ली | 30 January 2024 : सध्या इलेक्ट्रिक बाईकचे युग आले आहे. ईव्ही बाईककडे नागरिकांचा कल वाढत आहे. या बाईकची मागणी पण वाढत आहे. पण इलेक्ट्रिक बाईक, स्कूटरची किंमत अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे प्रत्येक जण नवीन ईव्ही खरेदी करु शकत नाही. पण आता जुनी पेट्रोल बाईक तुम्हाला इलेक्ट्रिक बाईकमध्ये सहज बदलता येईल. कोणत्या प्लॅटफॉर्मआधारे तुम्हाला पण जुन्या पेट्रोल बाईकचे इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बदल होऊ शकतो.
Just Electric
तुमची पेट्रोल बाईक जुनी झाली असेल तर ती तुम्हाला इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलता येते. तुमच्या शहरात पण असा एखादा मॅकेनिक मिळू शकेल. तरीही अडचणी कमी होत नाहीत. इलेक्ट्रिक बाईक तयार करणे सोपे नाही. पण एक भारतीय कंपनी Just Electric ने ग्राहकांची चिंता सोडवली आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल कन्वर्जन किट तयार करते. या कंपनीची किट वापरुन तुम्ही तुमची जुनी बाईक इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलवू शकता.
किटची किंमत तरी किती
इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, कंट्रोल युनिटी आणि आवश्यक टुल्सचा या किटमध्ये समावेश आहे. just electric च्या या किटची किंमत 25,000 रुपयांपासून सुरु होते. किटची किंमत बाईक मॉडेल आणि तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार असेल. त्यासाठी कंपनीच्या पोर्टलवर संपर्क साधता येईल. तुमच्या शहरात अथवा जवळच्या मेट्रो शहरात जस्ट इलेक्ट्रिकचे कार्यालय तुम्हाला शोधावे लागेल. तुम्ही मोबाईलवर पण अगोदर संपर्क साधू शकता. त्या आधारे बाईकची माहिती देऊन, व्हॉट्सअपवर फोटो पाठवून पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलता येईल की नाही, याची माहिती घेता येईल.
असा करा बदल
- just electric चे कार्यालय शोधा
- just electric चे इंजिनिअर्स तुमच्या बाईकची तपासणी करतील
- तुमची बाईक बदलता येत असेल तर त्यासंबंधीची माहिती देतील
- जस्ट इलेक्ट्रिकची टीम तुमच्या बाईकचे इंजिन हटवतील
- त्यानंतर कन्वर्जन किट इन्स्टॉल करण्यात येईल
- तुमची जुनी बाईक नवीन लूकसह इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलता येईल