देशातच होणार कारची सेफ्टी रेटींग क्रॅश टेस्ट, Bharat NCAP चे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
आता देशातच कारची सेफ्टी क्रॅश टेस्ट होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन होणार आहे.
नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : कारच्या वाढत्या अपघातांमुळे कारच्या सेफ्टी रेटींगचा विचार कार खरेदी करताना ग्राहक नक्कीच करीत असतात. परंतू आतापर्यंत कारच्या सेफ्टीची रेटींग करणारी ही क्रॅश टेस्ट परदेशात केली जात होती. आता भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम ( Bharat NCAP ) अंतर्गत भारतात उत्पादन होणारी आणि विक्री होणाऱ्या कारची टेस्ट आता देशातच होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन होणार आहे. या नव्या योजनेत 3.5 टन वजनाच्या वाहनांची क्रॅश टेस्ट करण्यात येणार आहे.
भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम अंतर्गत वाहन निर्माते आता स्वेच्छेने ऑटोमोटीव्ह इंडस्ट्री स्टॅंडर्ड ( AIS ) 197 अनूसार आपल्या वाहनांना टेस्टींगसाठी पाठवू शकतात. या टेस्टींगमध्ये वाहनाने दाखविलेल्या प्रगतीनूसार त्यांना प्रोढ प्रवाशांसाठी ( AOP ) आणि लहान मुलांसाठी चाईल्ड ऑक्युपेंट्स ( COP ) साठी स्टार रेटींग दिली जाणार आहे. आता भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांसाठी ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टच्या आधारे सेफ्टी रेटींग दिली जात होती. याशिवाय ही एजन्सी शोरुममधूनही वाहने घेऊन त्यांना रेटींग देऊ शकते.
आठ आसनांपर्यंतच्या वाहनांची चाचणी
कार क्रॅश टेस्टींगमध्ये वाहनांना त्यांच्या सुरक्षा फिचर्सनूसार 0 ते 5 स्टार रेटींग दिली जाते. त्यानूसार कार विकत घेताना सेफ्टी फिचर पाहून ग्राहक सुरक्षित वाहन खरेदी करीत असतो. आता देशातच रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीने देशातच क्रॅश टेस्ट करून वाहनांना सेफ्टी रेटींग देण्यासाठी पॅरामीटर निश्चित केले आहेत. यात देशात निर्माण केलेली किंवा आयात केलेली 3.5 टनापेक्षा कमी वजनाच्या M1 श्रेणीच्या वाहनांची सेफ्टी क्रॅश टेस्ट केली जाईल. M1 श्रेणीच्या वाहनात चालकाची सीट वगळून कमाल आठ सीट असतात.
कंपन्यांचा कार परदेशात पाठविण्याचा त्रास वाचणार
ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडीया ( ARAI ) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भारत न्यू कार एसेसमेंट प्रोग्रॅम अंतर्गत क्रॅश टेस्टची घेतली जाईल. ARAI संस्थेच्या नेतृत्वाखाली पुणे आणि चाकणमध्ये आधुनिक लॅब आहेत. ज्यांनी 800 हून अधिक प्री-एनसीएपी क्रॅश परीक्षण केले आहे. ही एजन्सी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रॅश टेस्टसाठी तयार आहे. या निर्णयाने वाहनांना परदेशात कार टेस्टसाठी पाठविण्याचा कार उत्पादकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.