ब्लॉग : ‘दिव्याखाली अंधार’ असताना अमेरिकेचं भारताकडे बोट
प्रदूषणासाठी भारत आणि चीन जबाबदार आहेत, भारतातल्या काही शहरांमध्ये तर श्वासही घेता येत नाही, हे वक्तव्य करत ट्रम्प यांनी कदाचित दिल्लीतल्या प्रदूषणाचा दाखला दिला असावा.
स्वतःची पाटी कोरी असताना दुसऱ्याकडे बोट दाखवण्याच्या प्रवृत्तीला आपल्याकडे ‘दिव्याखाली अंधार’ म्हणतात. ब्रिटन दौरा आटोपून आयर्लंडला रवाना होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरण दिनावर काही तरी प्रतिक्रिया द्यायची दिली म्हणून दिली आणि प्रदूषणाचं खापर भारत, चीनवर फोडलं. मुळात प्रदूषणावर डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच साष्टांग दंडवत घालायला हवा. जो व्यक्ती क्लायमेट चेंज वगैरे असा काही प्रकार आहे हे मान्यच करत नाही, तो पर्यावरणावर काय बोलणार? प्रदूषणासाठी भारत आणि चीन जबाबदार आहेत, भारतातल्या काही शहरांमध्ये तर श्वासही घेता येत नाही, हे वक्तव्य करत ट्रम्प यांनी कदाचित दिल्लीतल्या प्रदूषणाचा दाखला दिला असावा. भारतातली प्रदूषणाची परिस्थिती काही प्रमाणात सत्य असली तरी ज्या व्यासपीठावरुन ट्रम्प यांनी हा आरोप केला ते व्यासपीठ मुळात चुकीचं होतं. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत अमेरिका क्लायमेट चेंजवरच्या प्रस्तावातून काढता पाय घेते आणि मीडियासमोर एका विकसनशील देशाला प्रदूषणासाठी जबाबदार धरते ही फक्त जबाबदारी ढकलण्याची प्रवृत्ती म्हणता येईल.
प्रदूषण आणि क्लायमेट चेंजमध्ये सर्वात मोठा वाटा अमेरिकेसारख्या विकसित देशांचा आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार, per capita carbon dioxide emissions from fuel combustion च्या यादीत अमेरिकेचा वाटा तब्बल 15.53 टक्के आहे. तर चीनचा 6.59 टक्के आणि भारताचा केवळ 1.58 टक्के आहे. प्रदूषणाच्या बाबतीत कोण किती पाण्यात आहे हे पाहण्यासाठी एवढी आकडेवारी पुरेशी आहे. विशेष म्हणजे जागतिक व्यासपीठावरुन गेल्या काही वर्षात भारताने क्लायमेट चेंज, सौर ऊर्जा, प्रदूषण यासाठी जे प्रयत्न केलेत, त्याचं कौतुक संयुक्त राष्ट्राने UN’s Champions of the Earth award देऊन केलंय. कॅनडा, अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया या देशांचा प्रदूषण वाढवण्यात प्रमुख वाटा आहे. पण याचा भार गरीब देशांवर येतो आणि जबाबदारीही अविकसित देशांवरच ढकलली जाते. ही तफावत टाळण्यासाठी United Nations Framework Convention on Climate Change नुसार सदस्य देशांना आपापली जबाबदारी वाटून दिलेली आहे. यातही अमेरिकेसारखा देश कायम नव्या अटी टाकून चालढकल करतो, क्लायमेट चेंजचा काही परिणाम आहे हे अमेरिकेला मान्यच नसतं आणि स्वतःवर जेव्हा येतं तेव्हा विकसनशिल देशांकडे बोट दाखवलं जातं. डोनाल्ड ट्रम्प यांचं ज्ञान पाजळण्यासाठी त्यांचं स्वतःचंच एक ट्वीट पुरेसं आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत शिकागोसह अनेक भागात तापमान (Extreme Cold in USA) जवळपास -50 डिग्रीपर्यंत गेलं होतं, ज्यामुळे 20 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. यावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया होती, “सगले ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, आता कुठे आहे ग्लोबल वॉर्मिंग? तापमान -60 डिग्रीपर्यंत जाऊ शकतं, ग्लोबल वॉर्मिंगने आमच्याकडेही यावं” हे ट्वीट पाहून ट्रम्प यांच्यावर पर्यावरण तज्ञांनी असंवेदनशील म्हणून टीकाही केली होती. पण कुणाच्या बोलण्याचा फरक पडेल ते ट्रम्प कसले.
अर्थात, भारताची प्रदूषणाच्या बाबतीत पाठ थोपटून घ्यावी अशी परिस्थिती बिलकुल नाही. पण अमेरिकेच्या तुलनेत आणि साक्षरता दर पाहता प्रयत्न चांगले आहेत हे म्हणता येईल. जगातल्या दहा प्रदूषित देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या 2017 च्या आकडेवारीनुसार, सौदी अरेबिया, कतार, इजिप्त, बांगलादेश, कुवैत, कॅमेरॉन, यूएई, नेपाळ, भारत आणि लिबिया यांचा अनुक्रमे पहिला ते दहावा क्रमांक लागतो, ज्यात भारत नवव्या स्थानावर आहे. ग्लोबल वॉर्मिंगला गांभीर्याने घेत नसलेल्या अमेरिकेची प्रदूषणाच्या बाबतीत कामगिरी चांगली असली तरी साक्षरता दरही त्यामागचं महत्त्वाचं कारण मानलं जातं. कोणत्याही देशात प्रदूषणाशी लढणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाला होत नाही तोपर्यंत परदेशातून अशी वक्तव्य येणं स्वाभाविक आहे. दिल्लीतलं प्रदूषण तर दरवर्षी दिवाळीनंतर जागतिक पातळीवर चर्चेचा मुद्दा बनतं. ट्रम्प यांचं बोलणं आपल्या जिव्हारी लागून त्यानिमित्ताने का होईना प्रदूषण ही आपली वैयक्तिक समस्या आहे याची जाणीव प्रत्येकाला होणं गरजेचं आहे.