Union Budget 2024 : नवीन हॉस्टेल, 3 कोटींच्या योजना अन्…; अर्थसंकल्पात महिलांसाठी भरघोस तरतुदी
देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे, असे निर्मला सीतारमन यांनी म्हटले.
Union Budget 2024 For Women : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाचे आर्थिक वर्ष 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी महिलांसाठी भरघोस तरतुदी केल्या आहेत.
निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. नोकरदार महिलांसाठी नवीन हॉस्टेल उभारण्यात येणार आहेत. यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येतही वाढ होईल. तसेच नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासोबतच सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कॉपरेशन पॉलिसी राबवली जाणार आहे. याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे, असे निर्मला सीतारमन यांनी म्हटले.
3 लाख कोटी रुपयांची तरतूद
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जाणार आहेत. त्यासोबतच खासगी कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य ती पाऊलं टाकली जाणार आहेत, असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
सीमा शुल्कात कपात
केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून कमी करण्यात आली. आता सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. कस्टम ड्युटीत अर्ध्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात आता पुन्हा चैतन्य दिसून येईल.
त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसली. सोने जवळपास 2 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. बजेट संपताच लागलीच सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1988 रुपयांपर्यंत खाली आली. या घसरणीनंतर सोने 70730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले.