Reliance गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, केली छप्परफाड कमाई
Mukesh Ambani | मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्स असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 175.31 अंक म्हणजे 026 टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यात रिलायन्सच्या शेअरधारकांना मोठा फायदा झाला. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली. या 5 दिवसांत शेअर बाजारात रिलायन्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पडला.
नवी दिल्ली | 26 नोव्हेंबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठा पल्ला गाठला. शेअरधारकांनी जबरदस्त कमाई केली. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सोमवार ते शुक्रवारपर्यंत 5 दिवसांच्या व्यवहारात रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी 26,000 कोटी रुपयांची दौलत तयार केली. गुंतवणूकदारांनी या पाच दिवसांत मोठी कमाई केली. बाजारात चढउतार होत असला तरी गेल्या आठवड्यात बाजाराने 175.31 अंक म्हणजे 026 टक्क्यांची आगेकूच केली. त्याचा फायदा शेअरहोल्डर्सला झाला.
टॉप-10 मधील 4 कंपन्यांचे भांडवल वाढले
देशातील टॉप-10 मधील 4 कंपन्यांचे भांडवल या दरम्या वाढले. तर सहा कंपन्यांचे बाजारातील भांडवल घसरले. चार कंपन्यांनी मोठी झेप घेतली. मुकेश अंबानी यांची देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल कंपनीचा समावेश आहे.
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचा फायदा
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल गेल्या आठवड्यात वाढले. 16,19,907.39 कोटी रुपयांवर ते पोहचले. यापूर्वीच्या आठवड्यापेक्षा त्यामध्ये 26,014.36 कोटी रुपयांची वाढ झाली. दुसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बँकेचा क्रमांक लागतो. बँकेचे मार्केट कॅप 20,490.9 कोटी रुपयांहून 11,62,706.71 कोटी रुपयांवर पोहचले. भारतीय एअरटेलच्या गुंतवणूकदारांनी या कालावधीत 14,135.21 कोटी रुपयांची कमाई केली. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 5,46,720.84 रुपयांवर पोहचले. तर आयसीआयसीआय बँकेचे बाजारातील भांडवलात 5,030.88 कोटी रुपयांची वाढ झाली. बँकेचे भांडवल 6,51,285.29 कोटी रुपयांवर गेले.
टाटा कंपनीला फटका
या आठवड्यात गुंतवणूकदारांचे नुकसान करण्यात टाटा आघाडीवर आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेला मोठा फटका बसला. या कंपनीचे बाजारातील भांडवल 16,484.03 कोटी रुपये घसरले. ते आता 12,65,153.60 कोटी रुपयांवर आले. तर बजाज फायनान्स कंपनीचे मार्केट कॅप 12,202.87 कोटी रुपयांनी घसरले. ते 4,33,966.53 कोटी रुपयांपर्यंत खाली आले. हिंदुस्थान युनिलिव्हरला 3,406.91 कोटींचा फटका बसला. युनिलिव्हरचे भांडवल 5,90,910.45 कोटी रुपयांपर्यंत खाली आले.
रिलायन्स इंडस्ट्रीज क्रमांक एकवर
मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्स असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 175.31 अंक म्हणजे 026 टक्क्यांची उसळी घेतली. बाजारातील भांडवलाचा विचार करता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज Top-10 मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, भारतीय स्टेट बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचा क्रमांक लागतो.