विमान कंपनीला, मच्छर पळवणारी फर्म देत होती पगार, उगाच दिवाळं निघालं नाही महाराजा
Naresh Goyal | बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या अनेक सुरस कथा बाहेर येत आहे. या कंपनीच्या अनियमिततेची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. ईडीच्या दोषारोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात जेट एअरवेजच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगाराचा रोचक किस्सा देण्यात आला आहे. त्यासाठी एक कन्सलटन्सी फर्मला पण काम देण्यात आले होते.
नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : बंद पडलेल्या जेट एअरवेजविषयीचे (Jet Airways) अनेक किस्से समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणात चौकशी करत आहे. त्यानुसार, काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार मच्छर कॉईल तयार करणाऱ्या कंपनीने दिला. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांची पत्नी आणि इतर जणांविरोधात याप्रकरणात ईडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. मॉस्किटो कॉईल, केमिकल आणि फार्मास्युटिकल्स तयार करणारी कंपनी एस. ए. संगनानी अँड असोसिएट्सने जेट एअरवेजच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन केले. त्यासाठी 40.9 कोटी रुपये मोजले. कंपनीने याविषयीची माहिती नफा-तोटा खतावणीत त्याची माहिती नोंदवली नाही.
काय आहे दोषारोपपत्रात
दोषारोपपत्रानुसार, जनरल मॅनेजर आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन गोपनिय ठेवण्यात आले होते. त्यासाठी गोयल यांनी एका कन्सल्टेंसीची नियुक्ती केली होती. एचडी पाठक आणि असोसिएट्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. गोयल यांची पत्नी अनिता जेट एअरवेजच्या उपाध्यक्ष होत्या. तर मुलगी नम्रता ही ग्राहक सेवा विभागात होती. मुलगा निवान याला कंपनी व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती. या कलन्स्टन्सी फर्मला 279.5 कोटी रुपये देण्यात आले. अर्थात या सर्व आरोपांवर नरेश गोयल यांनी कानावर हात ठेवले आहेत.
मालमत्ता जप्त
जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम (PMLA) 2002 मधील विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत 538 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये अनेक कंपन्या आणि व्यक्तींच्या मालमत्तांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 17 रहिवाशी फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यानेच केली पोलखोल
याप्रकरणी कन्सल्टन्सी फर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ईडीसमोर हा प्रकार कथन केला. जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाचा पगार ही फर्म करत असल्याचे समोर आले. कन्सल्टन्सी फर्म जेट एअरवेजच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या सेवेसाठी एक हजार रुपये शुल्क आकारत होती. जेट एअरवेज पगाराची रक्कम पाठक एचडी अँड असोसिएशट्सच्या चालू खात्यात हस्तांतरीत करत असे. ईमेल आधारे कर्मचाऱ्याचे नाव, रक्कम आणि खात्याची माहिती देत असे. त्यानंतर पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असे.