Rafael Deal : राफेल जमिनीवर? अनिल अंबानी यांची डिफेन्स कंपनी दिवाळखोरीत
Rafael Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे. अनिल अंबानी यांची डिफेन्स सेक्टरमधील कंपनी पण दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे राफेलच्या संपूर्ण प्रक्रियावरच प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्यापासून 13-14 जुलैपासून फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पण त्यापूर्वीच एका बातमीने झटका दिला आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) यांची डिफेन्स सेक्टरमधील कंपनी पण दिवाळखोरीत निघाली आहे. यापूर्वीच अनिल अंबानी यांनी दिवाळखोरीची घोषणा केलेली आहे. त्यांच्या इतर अनेक कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. तर काही या प्रक्रियेत आहेत. आता अहमदाबाद येथील एनसीएलटी न्यायाधीकरणाने डिफेन्स सेक्टरमधील कंपनीच्या दिवाळीखोरीचा (Defense Sector Company Bankrupt) मार्ग मोकळा केला आहे. याच कंपनीच्या माध्यमातून भारतात फ्रान्सचे फायटर जेट राफेल (Rafael Deal) दाखल झाले होते. त्यामुळे एकूणच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे तर विरोधकांना केंद्र सरकारविरोधात आयतं कोलीत मिळालं आहे.
Rafael M ची खरेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे. सध्या फ्रान्स निर्वासीतांच्या दंगलीप्रकरणात गुरफटलेला आहे. त्याचवेळी हा दौरा होत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान संरक्षण क्षेत्रातील मोठा करार करण्याची शक्यता आहे. ते नौसेनेसाठी राफेल एमची खरेदी करु शकतात.
पाच वर्षांपूर्वी झाली घडामोड तर पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडने राफेल जेट तयारी करणाारी कंपनी डसॉ एव्हिशनसोबत करार केला होता. त्यातंर्गत भारतीय वायुसेनेसाठी 36 राफेल जेट फायटरची खरेदी झाली होती.
विरोधकांनी केला होता हल्लाबोल अनिल अंबानी यांच्या उद्योगाला घरघर लागलेली होती. अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देण्याचा हा प्रकार विरोधकांना रुचला नाही. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला होता. हा करार 30 हजार कोटी रुपयांचा होता. त्यानंतर राफेलच्या अपघातानंतर पण प्रश्न उठविण्यात आले होते.
अशी घडली घडामोड
- रिलायन्स कॅपटिलनंतर रिलायन्सची नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड (RNEL) ही कंपनी दिवाळखोरीत गेली. याच कंपनीच्या माध्यमातून अनिल अंबानी यांनी संरक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले होते. आरएनईएलची मुळ कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे.
- अनिल अंबानी यांच्या समूहाने वर्ष 2015 मध्ये पीपावाव डिफेंस अँड ऑफशोर इंजिनियरिंग लिमिटेड खरेदी केली होती. या कंपनीचे नावात बदल करण्यात आला. रिलायन्स डिफेंस अँड इंजिनिअरिंग लिमिटेड असे नाव देण्यात आले. राफेल डील या समूहाचा पहिला मोठा सौदा होता.
- या कंपनीने डसॉ या फ्रान्सच्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम सुरु केला. कंपनीचे नाव होते डसॉ रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड, यामध्ये रिलायन्सचा वाटा 51 टक्के तर डसॉची हिस्सेदारी 49 टक्के होती.
- कंपनीने नागपूर येथील मिहान येथील स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये काराखाना टाकला. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लढाऊ विमानाचे सुट्टे भाग एकत्रित करुन फायटर जेट तयार करण्याचे काम सुरु झाले.
- पण अनिल अंबानी यांची रिलायन्स नेव्हल डिफेंस अँड इंजिनिअरिंग कंपनी कर्जाच्या दलदलीत अडकली आहे. कर्ज न चुकवल्याने कर्ज देणाऱ्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये धाव घेतली होती. NCLT च्या अहमदाबाद येथील विशेष पीठाने नीलामीच्या प्रक्रियेला मंजूरी दिली आहे.
- स्वान एनर्जी या कंपनीने अनिल अंबानी यांची ही दिवाळखोर कंपनी खरेदीसाठी इच्छा दर्शवली आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनी तयार आहे. कंपनीने खरेदीसाठी 2,700 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
- दरम्यान यापूर्वीच्या राफेल कराराचे काय होणार, राफेलसंबंधीच्या सेवासंबंधी काय होईल, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच मिहानमधील कारखान्याचे काय होईल. असा प्रश्न आहे. या सर्व घडामोडींमुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे, हे मात्र नक्की.