ATM मधून पैसे काढणं महागणार, प्रत्येक व्यवहारासाठी पैसे लागणार, जाणून घ्या
ATM मधून पैसे काढल्यास 1 मे पासून तुमच्या खिशातील खर्च वाढणार असून प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. NPCI च्या या दरवाढीच्या प्रस्तावाला RBI ने मंजुरी दिली आहे.

ATM Withdraw Fee Hike : तुम्ही अनेकदा ATM मध्ये पैसे काढण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी आहे. खरं तर आता ATM मधून पैसे काढणे महागात पडणार असून मशीनमधून पैसे काढण्यासाठी तुमचा खिसा हलका होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ATM इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यास मंजुरी दिली असून हे वाढीव शुल्क 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर.
रिपोर्टनुसार, 1 मे पासून बदलणाऱ्या नियमांनुसार होम बँक नेटवर्कबाहेरील ATM मशिनमधून कोणताही व्यवहार झाला किंवा बॅलन्स चेक झाला तर युजरला जास्त पैसे मोजावे लागतील. सध्या होम बँकेच्या नेटवर्कबाहेर ATM वापरण्याचे शुल्क लागू असून 1 मेपासून त्यात आणखी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावाच्या आधारे RBI ने मंजूर केलेल्या दुरुस्तीचा भाग आहे.
रिपोर्टनुसार, आतापर्यंत ग्राहक आपल्या होम बँकेच्या ATM व्यतिरिक्त इतर नेटवर्कच्या बँकेच्या ATM मधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक व्यवहारावर 17 रुपये शुल्क द्यावे लागत होते, जे 1 मे पासून 19 रुपये होईल. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या ATM मधून बॅलन्स चेक करत असाल तर त्यासाठी 6 रुपये आकारले जात होते, ते आता 7 रुपये करण्यात येणार आहेत.
जेव्हा बँक युजर्स त्यांच्या विनामूल्य मासिक व्यवहार मर्यादेनंतर पैसे काढतात तेव्हा हे शुल्क लागू होते. मेट्रो शहरांमध्ये होम बँक वगळता इतर ATM मधून मोफत व्यवहाराची मर्यादा पाच निश्चित करण्यात आली आहे, तर बिगर मेट्रो शहरांमध्ये या मोफत व्यवहाराची मर्यादा तीन आहे.
व्हाईट लेव्हल ATM चालकांकडून ATM पैसे काढण्याच्या शुल्कवाढीची मागणी सातत्याने केली जात होती. वाढता ऑपरेटिंग खर्च लक्षात घेता जुने शुल्क कमी असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. NPCI च्या प्रस्तावाला RBI ने मंजुरी दिल्यानंतर छोट्या बँकांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांच्या मर्यादित पायाभूत सुविधांमुळे ते इतर बँकांच्या ATM नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, वाढीव इंटरचेंज फी ही अशी रक्कम आहे जी बँक दुसऱ्या बँकेला देते जेव्हा त्याचा एक ग्राहक पैसे काढण्यासाठी दुसऱ्या बँकेच्या ATM चा वापर करतो.