पगाराच्या दिवशीच बँका बंद, रविवारला जोडून दोन दिवस संप, थेट सोमवारी बँका उघडणार
रविवारच्या सुट्टीला जोडून बँक संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे एकूण तीन दिवस बँकांचं कामकाज बंद राहील.
नवी दिल्ली : बँकांची कामं करण्यासाठी आता तुम्हाला सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण देशातील सर्व सरकारी बँका आज आणि उद्या (शुक्रवार 31 जानेवारी आणि शनिवार 1 फेब्रुवारी) संपावर आहेत. रविवारच्या सुट्टीला जोडून पुकारलेल्या संपामुळे एकूण तीन दिवस बँकांचं कामकाज बंद (Bank Employee Strike) राहील.
बँक कर्मचारी संघटनांची मध्यवर्ती संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ आणि ‘इंडियन बँक असोसिएशन’ यांच्या वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर गुरुवारी कोणतीही सहमती न झाल्यामुळे संपाचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपामुळे बँकांच्या शाखेतील कामकाज बंद असेल. 31 जानेवारी आणि एक फेब्रुवारीचा संप, तर दोन फेब्रुवारी रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत.
कोण-कोणत्या संघटना संपाला पाठिंबा?
इंडियन बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्याशी निगडीत 9 संघटनांनी देशभरात संपाची हाक दिली आहे.
‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’अंतर्गत ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’, ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन’, ‘नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज’, ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशऩ’, ‘बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ यांचा समावेश आहे.
याशिवाय ‘इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन’, ‘इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस’, ‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स’ आणि ‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स’ या संघटनांचा सहभाग (Bank Employee Strike) आहे.