INVESTMENT TIPS : बँक ऑफ इंडियाची नवी स्कीम, 444 दिवसांची ठेव; 5.5% व्याज
रिझर्व्ह बँकेने (Reserve bank) अलीकडे मुदत ठेव तसेच आवर्ती ठेवींवरील व्याज दरात फेररचना केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.
नवी दिल्ली : बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियांन 444 दिवसांची नवीन मुदत ठेव योजना जारी केली आहे. या योजनेनुसार ग्राहकांना 5.50% व्याज दर उपलब्ध होणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत असून 0.50% अधिक व्याज ठेवींवर उपलब्ध असेल. बँक ऑफ इंडियाची 444 दिवसांसाठी स्पेशल मुदत ठेव योजना (Special term deposit plan) असणार आहे. चालू वर्षी 7 डिसेंबरला बँकेचा 117 वा स्थापना दिवस आहे. त्याचे औचित्य साधून ग्राहकांसाठी आकर्षक योजना बँकेच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve bank) अलीकडे मुदत ठेव तसेच आवर्ती ठेवींवरील व्याज दरात फेररचना केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.
ऑनलाईन व ऑफलाईन खरेदी
बँक ऑफ इंडियाची नवीन मुदत ठेव योजना बँकेच्या सर्व शाखा तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन देखील खरेदी केली जाऊ शकते. इतकचं नव्हे तर ग्राहक थेट बँकेच्या मोबाईल अॅपद्वारेही योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू इच्छित असल्यास तुम्हाला त्वरा करावी लागेल. स्पेशल मुदत ठेव योजना ही विशिष्ट कालावधीसाठीच उपलब्ध असणार आहे. ज्येष्ठ नागरिक अधिकच्या व्याजासह योजनेचा लाभ घेऊ शकतात.
व्याज दरात बदल
बँक ऑफ इंडियाने 2 कोटीहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात बदल केला आहे. 2 कोटीहून कम रक्कम 444 दिवसांसाठी गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 5.50% दराने व्याज मिळेल. मॅच्युरिटीच्या आधारावर हा व्याज दर सर्वाधिक आहे. 445 दिवस ते 3 वर्षापर्यंतच्या मॅच्युरिटी रकमेवर 5.40% व्याज असेल. 3 ते 10 वर्षांच्या ठेवींवर बँक ऑफ इंडिया 5.35% व्याज देणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत
ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवरील व्याज दरात विशेष सवलत आहे. ज्येष्ठ नागरीक 3 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करत असल्यास त्यांना 25 बेसिस पॉईंट अतिरिक्त व्याज मिळेल. बँक ऑफ इंडियाच्या 2 कोटीहून कमी रकमेच्या ठेवीवर 3 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधींच्या ठेवीवर 25 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळेल. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक 3 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 75 बेसिस अंकांचा फायदा होईल. इतर वयोगटातील सर्वसाधारण ग्राहकांच्या तुलनेत हा व्याज दर अधिक असणार आहे.