मुघलकाळात सुरु झाली ही कंपनी आजही अव्वल, 300 वर्षांचा इतिहास, मुंबईच्या विकासातही मोठे योगदान
टाटा आणि बिर्ला यांच्या कंपनीच्या आधीही भारतामध्ये 1736 मध्ये एक कंपनी होती. ही देशातील सर्वात जुनी कंपनी आहे. कपडे, बिस्किटे आणि दुग्धव्यवसायापासून व्यापारापर्यंत त्या कंपनीचा व्यवसाय पसरला होता. मुंबईच्या विकासातही या कंपनीचे मोठे योगदान होते.
भारताने आपल्या आघाडीच्या व्यावसायिक गटांद्वारे संपूर्ण जगात आपली छाप सोडली आहे. स्वातंत्र्यानंतर टाटा आणि बिर्ला यांची नावे लोकांच्या ओठावर होती. आता अंबानी आणि अदानी यांची नावेही जगातील मोठ्या उद्योगपतींचा यादीत जाऊन बसली. याशिवाय गोयंका, नाडर, प्रेमजी आणि गोदरेज कुटुंबीयांची नावेही भारतीय व्यावसायिक जगतात आदराने घेतली जातात. मात्र, यापैकी कोणताही ग्रुप देशातला सर्वात जुना ग्रुप नाही. टाटा आणि बिर्ला समुहाचे नाव सर्वात जुनी कंपनी म्हणून घेतले जाते. परंतु, हे समूह देशातील देशातील सर्वात जुने व्यावसायिक गट नाही. तर, त्याआधीही भारतामध्ये एका समुहाचे नाव गाजत होते. त्या कंपनीला 300 वर्षांचा इतिहास आहे. हा समूह आहे वाडिया समूह.
1707 मध्ये मुघल बादशहा औरंगजेब याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या तीस वर्षांनी म्हणजे 1736 मध्ये गुजरातच्या सुरत येथील लवजी नुसेरवानजी वाडिया यांनी सिगनपूर येथे वाडिया समूह सुरू केला. त्यावेळी वस्तूंची देवाणघेवाण ते करत असत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जहाजे बांधण्यासाठी लोकांची गरज भासत होती. नेमकी हीच बाब हरून वाडिया समूहाने आपला व्यवसाय वाढविण्यास सुरुवात केली. त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली. ब्रिटिश ईस्ट इंडियासाठी जहाजे बांधण्याचे काम त्यांनी सुरु केले. आशियातील पहिला बॉम्बे ड्राय डॉक 1750 मध्ये लवजी आणि त्याचा भाऊ सोराबजी यांनी बांधला होता.
भारताला व्यवसायाचे व्यसन लावणारी ही देशातील सर्वात जुनी कंपनी आहे. वाडिया समुहाने सुरवातीला जहाज बांधणीचे काम सुरु केले. जहाजे बांधण्याचे आणि मुंबईची पहिली गोदी बांधण्याचे कंत्राट वाडिया समूहाला मिळाले. त्यांनी एक पाया रचला ज्यावर येणाऱ्या पिढ्यांनी वाडिया ग्रुपची इमारत उभी केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत वाडिया समुहाने मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वाडिया समूहाचे मार्केट 1.20 लाख कोटी
वाडिया समूह 1.20 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह एक व्यावसायिक समूह बनला आहे. या समूहाच्या बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या तीन कंपन्या 100 वर्षांहून अधिक काळ स्टॉक एक्स्चेंजवर आपले स्थान टिकवून आहेत. बॉम्बे डाईंगची स्थापना 1879 मध्ये झाली. वस्त्रोद्योगातील दिग्गज कंपनीमध्ये त्याची गणना होते.
1892 साली स्थापन झालेली ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनी बिस्किटांपासून दुग्धजन्य पदार्थांपर्यंत सर्व काही तयार करते. तर, बॉम्बे बर्मा ट्रेडिंगची स्थापना 1863 मध्ये झाली. ही कंपनी वृक्षारोपण, आरोग्यसेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या नुस्ली वाडिया हे या समुहाचे प्रमुख आहेत. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे ते नातू आहेत. अनेक कायदेशीर लढाया लढल्याबद्दल वाडिया यांना कॉर्पोरेट सामुराई म्हणूनही संबोधले जाते.