Insurance Fraud: भाऊ, विम्यातही होऊ शकते फसवणूक! बोगस एजंट तुमची रक्कम घेऊन होईल रफूचक्कर
fraudulent insurance companies: अत्यंत स्वस्तात विमा देण्याच्या आमिषाला चुकूनही बळी पडू नका. हा स्वस्त पडणारा विमा तुम्हाला महागात पडू शकेल. कारण बोगस एजंट तुमच्याकडून खोट्या कागदपत्रांवर स्वाक्षरी ही नेईल आणि तुम्हाला चूनाही लावेल. संकटकाळात या बोगस पॉलिसीचा तुम्हाला दमडीचा ही उपयोग होणार नाही.
सायबर फसवणूकीचे प्रकार आपण नेहमी बातम्यांमधून वाचतो. परंतू, सायबर विमा फसवणूक (Cyber Insurance fraud) हा प्रकार तुम्हाला कदाचित माहित नसेल. स्वस्तात विमा मिळवून (cheaper Insurance Policy) देण्याचे आमिष दाखवून तुमची लुबाडणूक केली जाते. कधी कधी तुमची गुप्त माहिती काढून तुम्हाला ब्लॅकमेलही(Blackmail) करण्यात येते. एवढा हा गंभीर प्रकार आहे. तेव्हा अशा विमा एजंटपासून सावध रहा. ऑनलाइन विमा पॉलिसी खरेदी (Online Insurance buy) करताना फसव्या विमा ऑफरला (Insurance Offer) बळी पडू नका. कमी प्रिमियमच्या लोभात तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने अलीकडेच सामान्य नागरिकांना अशा सायबर विमा फसवणुकीविरोधात जागरुक केले आहे. लोकांनी अशा फसव्या विमा ऑफरला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन पेमेंट केल्याने हा पैसा ही हातचा जाईल. तसेच याची रितसर तक्रार दिल्यानंतर ही तपास करुन आरोपींचा छडा लागने कठिण असते.
विमा फसवणुकीचे प्रकार कोणते?
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानुसार, विमा फसवणुकीचे केवळ ऑनलाईनच प्रकार नसतात तर इतर ही प्रकार असतात.
पहिला प्रकार असतो, माहितीची लपवाछपवीचा. यात विमा कंपनी अथवा विमा एजंट ग्राहकाला उत्पादन खरेदी करण्यासाठी असंबंध दावे सांगतो. त्याला भूलथापा मारतो. त्याला बळी पडून ग्राहक विमा खरेदी करतो. परंतू, पुढे त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. कधी कधी ग्राहक आरोग्य विम्यासाठी तपासणीची खोटी कागदपत्रे जोडतो, ही ग्राहकांकडून कंपनीची फसवणूक असते.
मध्यस्थी व्यक्तीकडून करण्यात येणारी फसवणूक दुस-या प्रकारात मोडते.विमा एजंट, कॉर्पोरेट एजंट, तृतीय पक्ष प्रशासक आणि मध्यस्थांकडून विमा कंपनी किंवा पॉलिसीधारक किंवा दोघांची यामध्ये फसवणूक करण्यात येते.
अंतर्गत फसवणूक: विमा कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि/किंवा इतर कर्मचारी सदस्य किंवा अधिकारी यांच्याकडून फसवणूक होते. ती अंतर्गत फसवणूक मानली जाते.
असा करा पडताळा
पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी विमा एजंटची रीतसर माहिती घेतली पाहिजे. त्याने एजंटची पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच एजंटकडे रक्कम दिल्यानंतर त्याने ती कार्यालयात जमा केली की नाही याची खातरजमा करावी. त्याच्याकडे रक्कम जमा केल्याची पावती मागावी. त्याच्यावर विसंबून राहू नये.
कोणतीही विमा पॉलिसी ऑनलाईन खरेदीपूर्वी त्या कंपनीची, संकेतस्थळाची माहिती करुन घ्यावी. बनावट संकेस्थळही आता तयार झाली आहेत. ऑनलाईन पेमेंट करताना वेबसाइटची वास्तविकता आणि विमा कंपनी, मध्यस्थ किंवा एजंटचा खरेपणा तपासावा असे आवाहन IRDAI ने केले आहे.अधिक माहितीसाठी, ग्राहक IRDAI च्या policyholder.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती मिळवू शकता.
फोन कॉलवर एजंटची पडताळणी करा. लागलीच कोणतीही कागदपत्रे त्याच्या हवाली करु नका. त्याला तुमच्या बँकिंगची संपूर्ण माहिती देऊ नका. अथवा पेमेंट स्कॅन कोडची तो मागणी करत असेल तर तात्काळ याविषयीची माहिती सायबर पोलिसांना द्या.