1 हजारांची नोकरी, पण पठ्ठ्याने हिंमत नाही हारली, असा झाला करोडपती, शेअर बाजाराने असे उघडले नशीब
Billionaire Success Story : शेअर बाजारात कोण रावाचा रंक होईल आणि रावाचा रंक होईल हे सांगता येत नाही. ते तुम्हाला शेअर बाजार किती कळला आणि जोखीम घेण्याची किती ताकद आहे, त्यावर अवलंबून आहे. या व्यक्तीने असाच एक करिष्मा करून दाखवला आहे. 1 हजारांची नोकरी करणारी व्यक्ती कशी झाली करोडपती?
शेअर बाजार हा काही जुगार नाही. ज्याला त्याची गणितं आणि अंदाज कळतात. ज्याचा अभ्यास आहे, त्यासाठी शेअर बाजार हा कामधेनुपेक्षा कमी नाही. शेअर बाजारात क्षणात रावाचा रंक होतो. तर रंकाचा राव होतो. धैर्य आणि योग्य खेळीच्या जोरावर अनेक जण शेअर बाजारात भरारी घेतात. या व्यक्तीने असाच एक करिष्मा करून दाखवला आहे. पोरिंजू वेलियाथ (Porinju Veliyath) यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना स्मॉल कॅप किंग म्हणतात. वेलियाथ यांनी एक हजारांच्या नोकरीत स्टॉक मार्केटमध्ये 120 कोटींचे साम्राज्य उभारले.
अगदी कमी वयात सोडले घर
पोरिंजू वेलियाथ यांचा जन्म 1962 मध्ये केरळमधील कोच्ची येथे झाला होता. त्यांचे सर्व कुटुंब हे त्रिशूर या गावात राहत होते. घरी थोडीफार शेती होती. त्यावरच त्यांच्या कुटुंबियांची गुजराण होत होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अगदी कमी वयात त्यांना गाव सोडावे लागले. 16 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि नोकरी केली.
1 हजारांची नोकरी
वेलियाथ यांची पहिली नोकरी ही एका हिशोबनिसाची होती. त्यासाठी त्यांना 1,000 रुपये मिळत होते. त्यानंतर त्यांचा पगार 2,500 रुपये झाला. मी कमी वयात नोकरी करू लागलो. तेव्हा राहण्याचा ठिकाणा सुद्धा नव्हता. त्यावेळी सातत्याने वाटायचे आपली परिस्थिती सुधारावी, जुन्या आठवणीत रमताना त्यांनी त्या कठीण काळातील अनेक अनुभव इतरांना सांगितले आहेत.
शहर नाही आवडले, पुन्हा गेले गावी
1990 मध्ये ते कोटक सिक्युरिटीजमध्ये फ्लोर ट्रेडर म्हणून काम करू लागले. पोरिंजू वेलियाथ या नोकरीसाठी मुंबईत आले होते. याठिकाणी त्यांचे नाव फ्रांसिस ठेवले होते. कंपनीत त्यांना रिसर्च ॲनालिस्ट आणि फंड मॅनेजर सारख्या पदाचा अनुभव मिळाला. त्यांनी शेअर बाजाराची सर्व बारीक सारीक माहिती संग्रही ठेवली. ही शिदोरी घेऊन ते मुंबई सोडून गावी परतले.
कोच्चीत सुरू केला श्रीगणेशा
मुंबईत शेअर बाजाराची बाराखडी पक्की केल्यावर ते कोच्चीत परतले. याठिकाणी त्यांनी 2002 मध्ये इक्विटी इंटेलिजेंस नावाने मनी फंड मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. या कंपनीच्या मार्फत त्यांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सुरू केले. ते सध्या आर्य वैद्य फार्मेसी कंपनीचे संचालक आहेत. त्यांची कंपनी हिंदुस्तान यूनिलिव्हर लिमिटेड (HUL) सोबत लिव्हर आयुष्य या ब्रँडच्या नावाने आयुर्वेदिक उत्पादनं तयार करण्याचं काम करते. ‘The Complete Step-by-Step Guide to the Stock Market and Investing’ या पुस्तकाची बाजारात चर्चा आहे.
पोरिंजू वेलियाथ यांचा पोर्टफोलिओ
Trendlyne.com नुसार, डिसेंबर 2015 मध्ये पोरिंजू वेलियाथ यांचा पोर्टफोलिओ 5.87 कोटी होता. सप्टेंबर 2021 मध्ये त्यात वाढ होऊन तो 213.11 कोटींवर पोहचला. कमी कालावधीत त्यांनी मोठी झेप घेतली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पोरिंजू वेलियाथ यांचा पोर्टफोलिओ कमी झाला. तो 120 कोटी रुपयांवर आला. मल्टिबॅगर स्टॉकवर डाव टाकण्यात ते माहीर असल्याचा दावा करण्यात येतो.