Share Market Dividend : गुंतवणूकदारांना लॉटरी! प्रति शेअर 59 रुपयांचा लाभांश, या कंपनीने केली घोषणा
Share Market Dividend : या कंपनीने गुंतवणूकदारांना मोठा लाभांश जाहीर केला आहे.
नवी दिल्ली : टीव्हीएस ग्रुपची कंपनी सुंदरम क्लाईटन लिमिटेडने (Sundaram Clayton Limited) गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. डिसेंबरच्या तिमाही निकाल हाती येताच कंपनीने गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 1180% लाभांश (Dividend Stocks) देण्याची घोषणा केली आहे. जर तुमच्याकडे या कंपनीचा शेअर असेल तर तुम्हाला प्रति शेअर 59 रुपयांचा लाभांश मिळेल. ही बातमी धडकताच कंपनीच्या शेअरधारकांमध्ये आनंदाची लहर उठली आहे. ज्यांच्याकडे जेवढे जास्त शेअर, त्या गुंतवणूकदारांना नवीन वर्षात लॉटरीच लागली आहे. त्यांना या रक्कमेतून आणखी शेअर खरेदी करता येऊ शकतात.
सुंदरम क्लाईटन लिमिटेड ही कंपनी अॅल्युमिनियम डाय कास्टिंगची मोठी पुरवठादार आहे. गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या लाभांशाची एकूण किंमत 119 कोटी रुपये होत आहे. चालु आर्थिक वर्षातील हा पहिला लाभांश आहे.
यापूर्वी कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 29 मार्च रोजी लाभांश दिला होता. त्यावेळीही कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. या कंपनीने 2021-22 मध्ये 44 रुपयांच्या लाभांशाची घोषणा केली होती. सप्टेंबर 2001 पासून या कंपनीने आतापर्यंत एकूण 45 लाभांश दिले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2023) एक दिवसापूर्वी कंपनीने शेअर बाजाराला लाभांश देण्याविषयीची सूचना दिली. संचालक मंडळाच्या (Board Of Directors) निर्णयाची माहिती दिली. यामध्ये गुंतवणूकदारांना प्रति शेअर 59 रुपयांचा अतंरिम लाभांश (Sundaram Clayton Interim Dividend) देण्याची माहिती देण्यात आली.
कंपनीच्या माहितीनुसार, 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या आधारावर ही रक्कम 1180 टक्के होते. कंपनीचे एकूण 2 कोटी 2 लाख 32 हजार 85 शेअर्स आहेत. यासंबंधीची 3 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर पेमेंट डेट 10 फेब्रवारी 2023 रोजी अथवा त्यानंतरची निश्चित करण्यात येईल.
सध्या Sundaram Clayton चा शेअर 4735 रुपये आहे. 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर हा शेअर 5800 रुपयांवर तर निच्चांकी पातळीवर 3500 रुपयांवर पोहचला होता. कंपनीचा मार्केट कॅप 9580 कोटी रुपये आहे.
एका वर्षात या कंपनीने 22 टक्क्यांचा परतावा दिला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत या कंपनीने 22.55 टक्क्यांची निव्वळ विक्री केली आहे. कंपनीने 8475.43 कोटी रुपयांची विक्री केली आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत हा आकडा 6915.62 कोटी रुपये होता.
सुंदरम क्लाईटन लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात 2.74 टक्क्यांची घसरण झाली. हा नफा आता 123.83 कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी समान तिमाहीत 127.32 कोटींच्या नफ्याची नोंद झाली होती. EBITDA मध्ये वार्षिक आधारावर 28.24 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा आकडा सध्या 1057.52 कोटी रुपये आहे. अर्निंग पर शेअरवर परिणाम झाला असून वार्षिक आधारावर तो 62.93 रुपयांहून घसरुन 61.20 रुपये झाला आहे.