Share Market : शेअर बाजारातून खोऱ्याने ओढा पैसा, पण स्ट्रॅटर्जी अशी ठेवा
Share Market : बाजार त्याच्या मूडप्रमाणे स्वींग होत असतो. बाजाराला त्याची दशा आणि दिशा माहिती असते. आता प्रश्न हा आहे की, समुद्राला तर तुम्ही वळण लावण्याच्या फंदात पडू शकत नाही. पण तुम्ही चांगले पोहायला शिकले तर अवघा समुद्र तुम्ही पालथा घालू शकतात, बरोबर की नाही!
नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) नशीब आजमावणारा कोणताही गुंतवणूकदार फायद्यासाठीच एंट्री घेतो हे नक्की. तो बाजारात पाऊल ठेवतो, तेच मुळी जबरदस्त फायदा होईल, चांगला परतावा मिळेल, या आशेने. पण त्याला नशीब साथ देत नाही. अथवा त्याला बाजाराच मुळी कळलेला नसतो. मग त्याच्या मेहनतीचा पैसा एका झटक्यात छुमंतर होतो आणि त्याचे डोळे उघडतात. पण ही झाली एक बाजू. बाजारात नुकसानीची शक्यता लक्षात घेऊनच उतरणे हितवाह असते. तरच तुम्ही कोठून नफा कमविता येईल, याची संधी शोधू शकता. एखादी बातमी वाचून जर तुम्ही बाजारात उतराल आणि शेअरवर (Share) डाव खेळाल तर तो अंगलट येईल. पण जर तुम्ही अभ्यास करुन, कंपनीचे प्रोफाईल, तिचे अपडेट, तुमची रणनीती यासह मैदानात उतराल. तर तुम्हाला शॉर्टटर्म आणि दीर्घकालीन या दोन्हीत फायदा होईल. प्रत्येकवेळी रणनीती (Strategy) योग्यच असणार नाही. पण नुकसान कमी होईल. एकदा विश्वास आणि अभ्यास वाढला की तुम्ही खोऱ्याने पैसा ओढाल.
शेअर बाजारात गुंतवणुकीपूर्वी तुमचा पर्याय निवडा. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची ते पाहा. स्टॉक, म्युच्युअल फंड, बाँड, डेरेवेटिव्ह यापैकी एक गुंतवणुकीचा पर्याय निवडा. हा पर्याय निवडीपूर्वी त्याचा चांगला अभ्यास करा. त्याशिवाय गुंतवणुकीची घाई करु नका. त्यातील बारकावे तपासा. त्यासंबंधीचे व्हिडिओ पाहा आणि नंतर गुंतवणूक करा.
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणुकीचा जो पर्याय निवडाल. त्यावर संशोधन करा. ही सवय अंगी भिनवा. नाहीतर डोळे झाकून गुंतवणुकीचा फटका तुम्हाला सहन करावा लागेल. संशोधन तुम्हाला त्या संबंधित कंपनीविषयीची माहिती देईल. त्याचा तुम्हाला गुंतवणुकीदरम्यान मोठा फायदा होईल. वृत्तपत्र, ऑनलाईन स्त्रोत, युट्यूब आणि इतर अनेक साधनांमधून तुम्हाला ही माहिती मिळू शकते. तुम्ही कष्टाचा पैसा उगाच शेअर बाजारात गुंतवू नका. त्यासाठी अभ्यास करा.
तुमचा पर्याय निवडल्यानंतर, गुंतवणुकीचे लक्ष्य ठरवल्यानंतर दुसरे शेअर आणि उत्पादनावर लक्ष्य केंद्रित करा. त्याठिकाणी कमाईच्या संधी शोधा. तुमच्यासाठी गुंतवणुकीची योग्य संधी, कालावधी , सुरक्षा, हमी आणि जोखीम याचा अंदाज घ्या. त्यानंतर गुंतवणूक किती करायची ते ठरवा. ही गुंतवणूक तुम्हाला वेळोवेळी वाढवता येईल.
नियमीत तुमच्या पोर्टफोलिओची स्थिती तपासा. दररोज निश्चित वेळी तुमचा पोर्टफोलिओ चेक करा. त्यात काही बदल करायचे असेल तर त्याचे नियोजन करा. तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सची कामगिरी तपासा. भविष्यातील या कंपन्यांच्या कामगिरीविषयी माहिती जमा करा. त्यामुळे भविष्यात हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत असावा की नसावा हे ठरविणे तुम्हाला शक्य होईल.
शेअर बाजारात भावानिक वातावरण, बातमी आणि इतर घडामोडींचा ही मोठा परिणाम दिसून येतो. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाची परिस्थिती आपण सर्वांनीच अनुभवली. त्यामुळे बाजाराविषयीच्या सर्व अपडेट मिळण्याची तजवीज करा. त्यासाठी सकाळी बिझनेस चॅनल्स सर्फिंग करा. अर्थविषयक घडामोडींवर लक्ष ठेवा. बाजाराची दशा आणि दिशा काय असेल याचा अंदाज घ्या. या छोट्या टिप्स तुम्हाला भविष्यातील चांगला गुंतवणूकदार बनवतील आणि त्याचा संपत्तीत वाढ करण्यासाठी मोठा फायदा होईल.