सोनं चकाकलं, एका वर्षात तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स, लवकरच 1 लाखाच्या वर जाणार?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात साततन्याने वाढ झालेली आहे. आता आगामी काळात सोनं थेट एका लाखावर पोहोचतं की काय? असं विचारलं जात आहे.

Gold Rate Today : सोनं दिवसेंदिवस महाग होत आहे. गेल्या काही महिन्यांत तर सोन्याचा भाव सातत्याने वाढल्याचं दिसलं आहे. दरम्यान, सोनं आजघडीला तब्बल 90 हजारांच्या पुढे जाऊन बसलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
गेल्या तीन महिन्यांत सोन्याचा भाव कसा बदलला?
गेल्या तीन महिन्यांत सोन्यानं मोठी भरारी घेतली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 76162 रुपये होता. हाच भाव 5 फेब्रुवारी 2025 रोजी प्रतितोळा 84207 रुपयांवर पोहोचलं होतं. 2 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 92700 रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. म्हणजेच गेल्या एका वर्षापूर्वी ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली होती. त्यांना या गुंतवणुकीत साधारण 20 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे.
गेल्या 15 महिन्यांत सोन्याचा भाव कसा बदलला?
1 जानेवारी 2024 रोजी सोन्याचा भाव 63352 रुपये प्रतितोळा होता. हाच भाव 2 एप्रिल 2025 रोजी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 92700 रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या काही महिन्यांत जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडल्या, बड्या देशांतील सत्ताबदल, युक्रेन-रशिया तसेच आखातातील युद्धामुळेही सोन्याचा भाव वाढला. असे असतानाच आता आगामी काळात आणखी चकाकणार का? असे विचारले जात आहे.
लग्नसराईत सोन्याचा दर वाढणार?
लग्नसराईच्या काळात सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. या काळात वधू आणि वरपक्षाकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने केले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे यावेळच्या लग्नसराईतही सोने आणि चांदीच्या दारात वाढ होणार का? तसेच ही वाढ किती होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ झालीच तर सामन्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.