Gold Silver Rate : नवीन वर्षात सोने-चांदी करेल कमाल, भावात होईल इतकी वाढ की..
Gold Silver Rate : सोने-चांदीचे दर यंदा नवीन विक्रम करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षांत सोने आणि चांदीत (Gold-Silver Price Today) गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर हा फायद्याचा सौदा ठरु शकतो. मोठ्या ब्रोकरेज हाऊसने यंदा, 2023 मध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत जोरदार वृद्धी दिसून येणार असल्याचा दावा केला आहे. डॉलर निर्देशांक (Dollar Index) कमकुवत झाला आहे तर महागाईच्या (Inflation) आघाडीवर सध्या दिलासा मिळाला आहे. या सर्वांचा फायदा 2023 मध्ये वायदे बाजाराला मिळण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने (ICICI Direct) सोने-चांदीवर सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे.
डॉलरमधील ढिल यंदा सोने-चांदीसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर औद्योगिक क्षेत्रात जोरदार मागणीमुळे चांदीत तेजी येणार आहे. ब्रोकरेज फर्मचा दावा आहे की, सोने 62,000 रुपये तर चांदी 80,000 रुपयांचा नवीन विक्रम रचतील. जस्त, तांबे, अॅल्युमिनियम आणि कच्चे तेलाच्या किंमतीही यंदा भडकण्याची शक्यता आहे.
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीआयसीआय डायरेक्टने यंदा सोन्याच्या किंमती बाबात मोठी भविष्यवाणी केली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव यंदा 62,000 रुपये राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डॉलर निर्देशांकातील घसरण त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. हा निर्देशांक घसरल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात वाढीचा सपाटा लावला होता. पण नवीन वर्षात व्याजदर वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. व्याजदर कपात होण्याची शक्यताही आहे.
तर चीनचा आर्थिक विकासही चांगला राहू शकतो. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होईल. जागतिक आर्थिक विकास दर घसरण्याची शक्यता आणि भू राजकीय तणाव पाहता सोन्याच्या किंमती वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, 2023 मध्ये दागिन्यांची मागणी कायम राहिल. तर यंदा गुंतवणूकही जोरदार असेल. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला ग्राहक पसंती देतील. आयसीआयसीआय डायरेक्टच्या अंदाजानुसार चांदीमुळे ग्राहकांची चांदी होईल. त्यांना जोरदार परतावा मिळेल.