Gold Silver Rate : सोन्याचा भाव विचारुच नका, पश्चाताप होईल, बाजारात सोन्याच्या भावाचीच चर्चा
Gold Silver Rate : सध्या गुंतवणूकदारांचा सोन्यावरच भरोसा असल्याचे चित्र आहे. सोने-चांदीतील गुंतवणूक मालामाल केल्याशिवाय राहणार नाही.
नवी दिल्ली : सोन्याचा भाव (Gold Price Today) काय आहे, हे विचारले तरी अनेकांना गुदगुदल्या होतात. तर काहींच्या कपाळावर आठ्या येतात. काय करणार सोन्याची घोडदौडच तशी सुरु आहे. त्यात चांदी तर मोठा उलटफेर करणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव 56,701 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर चांदीचा भाव (Silver Rate Today) 70,054 रुपये प्रति किलो आहेत. दिवाळीनंतर सोन्याचा भावाने उसळी घेतल्याने ऐन लग्नसराईत वऱ्हाड्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोने आणि चांदीच्या किंमती येत्या काळात अजून सूसाट पळतील असा तज्ज्ञांचा व्होरा आहे. त्यामुळे परंपरागत गुंतवणूकदारांचा (Investors) सर्वांनाच हेवा वाटणार यात नवल ते काय!
तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच त्याचे मागील सर्व विक्रम मोडीत काढणार आहे. सोने लवकरच 60 हजारांची सलामी देईल. सोन्याची किंमत 60 हजार रुपये प्रति 10 होईल. म्हणजे 24 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यांचा खिसा खाली होईल. तर ज्यांनी यापूर्वीच गुंतवणूक केली. त्यांचा मोठा फायदा होईल.
अर्थात या किंमती वाढण्यामागे काही कारणे आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम, अजून हे युद्ध किती दिवस लांबणार याची साशंकता. अमेरिकेसह इतर देशांना सतावणारी आर्थिक मंदीची धास्ती आणि इतर अनेक जागतिक कारणांमुळे सोने-चांदीची मागणी वाढली आहे. परिणामी किंमती आकाशाला भिडल्या आहेत.
मद्रास ज्वैलर्स आणि डायमंड मर्चेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष जयंतीलाल चल्लानी यांनी सोन्याच्या घोडदौडीची माहिती दिली. येत्या काही दिवसात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल, असा त्यांचा दावा आहे. सोमवारी कर जोडले असता हा भाव 58,550/24 कॅरेट 10 ग्रॅम होता.
एमके ग्लोबल फायनेंशियल सर्व्हिसेजनुसार, पश्चिमी देशात मंदीची भीती आहे. भू राजकीय तणाव पाहता, गुंतवणूकदार सोने खरेदीवर जोर देत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,800-1,880 डॉलर दरम्यान व्यापार करत आहे. युएस फेडमध्ये दर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होईल.
ऐन लग्नसराईतच सोन्याच्या किंमतींनी भरारी घेतल्याने अर्थातच सर्वच जण चिंतेत आहे. पण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येत असल्याने अनेकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर 2022 मध्ये सोने उच्चांकी पातळीवर होते, त्यापेक्षा ते 5-6 टक्के कमी व्यापार करत आहे.
सोने कमाल करत असले तर चांदी गुंतवणूकदारांची चांदी करणार आहे. सोन्याच्या किंमती 60,000 रुपये होतील. तर चांदीच्या किंमती आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार असल्याचे बोलले जात आहे. चांदीच्या किंमती 80 हजार रुपये प्रति किलो होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. चांदीतील गुंतवणूक ही फायदेशीर ठरणार आहे.