Gold Silver Price : सोने-चांदी पुन्हा महाग, आजचा भाव काय? गुंतवणुकीसाठी मोठी संधी..
Gold Silver Price : सोन्या-चांदीत आज पुन्हा तेजीचे सत्र राहीले..
नवी दिल्ली : दिवाळीत तज्ज्ञांनी सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) लग्नसराईत फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. सोन्यात जवळपास 5 टक्के तर चांदीच्या किंमतींनी (Silver Price) जवळपास 10 टक्क्यांची उसळी घेतली. येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती अजून वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामागील कारणे काय आहेत, ते जाणून घेऊयात..
गेल्या एका महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2640 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत तेजी दिसून आली. तर चांदीत 6333 रुपये प्रति किलो जबरदस्त वृद्धी दिसून आली. दिवाळी दरम्यान गुंतवणूक करणाऱ्यांना आता जोरदार परतावा मिळाला आहे.
इंडिया बुलियंस असोसिएशन (https://ibjarates.com) नुसार, 31 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा भाव 50480 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आता 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी सोन्याचा दर 53120 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहचला आहे.
तर 31 ऑक्टोबर 2022 रोजी चांदीची किंमत 57350 रुपये प्रति किलोग्रॅम होती. परंतु, 1 डिसेंबर 2022 रोजी चांदीत प्रति किलोमागे 6333 रुपयांची वाढ झाली आहे.आजचा भाव 63683 रुपये प्रति किलो आहे. चांदीची किंमत येत्या काही दिवसात 72,000 रुपयांच्या जवळपास जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गुरुवारी, 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी सोन्याच्या दरात 320 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आणि किंमती 53120 रुपयांवर पोहचल्या. यावर ग्राहकांना 3 टक्के GST मोजावा लागतो. चांदीच्या किंमतीत 1783 रुपये प्रति किलो वृद्धी दिसून आली. चांदीच्या भावात 63683 रुपयांवर पोहचला.
सध्या लग्नसराई सुरु आहे. एका अहवालानुसार, नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत देशात 32 लाख लग्न होतील. त्याचा थेट परिणाम बाजारावर होईल. सराफा बाजारात कमालीची विक्री होईल. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता आहे.