ITR : ‘चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला’; 1 रुपयांच्या इनकम टॅक्स वादासाठी 50 हजारांचा भूर्दंड बसला
Income Tax Return : तर मित्रांनो आयकर भरण्याची वेळ जशी जशी जवळ येत आहे, प्रत्येकाची घाई सुरु आहे. पण या घाईत घाईचा कसा फटका बसतो, त्याचे एक उदाहरण समोर आले आहे. 1 रुपयांच्या आयकर वादासाठी एकाला 50 हजार रुपये मोजावे लागले आहे.
तर मंडळी आयकर भरण्यासाठी अनेकांची गडबड उडालेली आहे. प्रत्येकाला मुदतीच्या आत आयटीआर भरायचा आहे. कोणी सीएची मदत घेत आहे. तर काहीजण स्वतःच आयटी रिटर्न्स भरण्याचा खटाटोप करत आहेत. पण या घिसाडघाईत एक चूक किती महागात पडू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे. जर करासंबंधीची काही प्रकरणं जास्त किचकट असतील तर अर्थतज्ज्ञ, सीएची मदत घेणे क्रमप्राप्त असते. कित्येकदा तर कर भरण्यासाठीची जितकी रक्कम असते, त्यापेक्षा अधिक रक्कम नोटीस आल्यानंतर खर्च करावी लागू शकते.
एक रुपयासाठी 50 हजारांचा भुर्दंड
दिल्लीतील अपूर्व जैन यांना याचा चांगलाच अनुभव आला आहे. त्यांनी समाज माध्यमावर या विषयी एक पोस्ट लिहिली आहे. एक रुपयांच्या एका करासंबंधीच्या वादातून त्यांना 50 हजार रुपये मोजावे लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपला अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘मी अजिबात गंमत करत नाही, ज्या वादासाठी मी 50 हजार रुपये मोजले, तो वाद 1 रुपयांचा होता’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सीएला त्यांनी हे शुल्क अदा केले.
कराच्या किचकट प्रक्रियेवर पुन्हा चर्चा
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात आयकर पद्धतीतील किचकट प्रक्रियेवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर रणकंदन सुरु झाले आहे. भारतीय आयकर पद्धतीत कर भरणाऱ्यांना अत्यंत किचकट प्रक्रियेतून जावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एक रुपयांसाठी 50 हजार रुपये मोजावे लागत असल्याने नेटकऱ्यांनी चिंताच नाही तर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक युझर्संनी कर पद्धतीवर सवाल उभे केले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि अधिक सुटसुटीत करण्याचा आग्रह धरला आहे. तर काहींनी सीएच्या शुल्कावर प्रश्न उभे केले आहेत.
Paid 50000/- fee to CA for a IT notice I received recently wherein the final disputed value turned out to be Re 1/-. I am not joking. 🙃
— Apoorv Jain (@apoorvjain_1988) July 8, 2024
विना माहिती कर भरणे डोकेदुखी
प्राप्तिकर भरण्याला आता वेग आला आहे. देशातील सर्व करदात्यांना 31 जुलैपूर्वी आयकर भरण्याची संधी आहे. जर करदात्याने या मुदतीनंतर आयकर फाईल केले तर त्याला 5 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. यंदा लाखो करदाते असे आहेत की ते पहिल्यांदा कराचा भरणा करणार आहे. आयटीआर पहिल्यांदा फाईल करणार आहेत. विना माहिती आयकर भरल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यांना आयकर खात्याकडून नोटीस पण येऊ शकते. नोटीस आल्यानंतर करदाते हैराण होतात. त्यामुळे कर भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. विना माहिती कर भरणे ही डोकेदुखी ठरु शकते.
सूचना : हे वृत्त सोशल मीडियावरील दाव्यांच्या आधारे देण्यात आले आहे. tv9 मराठी त्याच्या सत्यतेची खात्री देत नाही.