कुणाकडून कार, कुणाकडून घर तर कुणाकडून शेअर मिळाले, अब्जाधीशांनी मुलं आणि नातवंडांना काय काय दिलं गिफ्ट
अनेक भारतीय अब्जाधीशांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या महागड्या भेटवस्तू हा सध्या चर्चेचा विषय आहे. नारायण मुर्ती यांच्या नातवाला दिलेले कोट्यवधी रुपयांचे शेअर्स, नीता अंबानींची श्लोकाला दिलेला महागडा हार आणि इतर अब्जाधीशांनी आपल्या कुटुंबीयांना दिलेली महागडी गिफ्ट यावर आज प्रकाश टाकण्यात आला आहे.
अब्जाधीशांची गोष्टच न्यारी असते. त्यांच्या खाण्यापिण्यापासून तर लाइफस्टाईलपर्यंतचा औरा काही औरच असतो. त्यांच्या प्रत्येक गोष्टींची छाप पडत असते. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीने महागडे गिफ्ट देतात तेव्हा तर त्याची चर्चाच होतेच होते. इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या सहा महिन्याच्या नातवाला अब्जावधीचं गिफ्ट दिलं. त्याची चर्चा अधूनमधून होत असतेच. त्यांनी आपल्या नातवाला कोट्यवधी रुपयांचे शेअर गिफ्ट म्हणून दिले आहेत. त्यामुळे त्यांचा नातू जगातील सर्वात छोटा अब्जाधीश झाला आहे. नारायण मूर्तीच नव्हे अनेक अब्जाधीशांनी आपल्या मुलांना आणि नातवांना कोट्यवधींचं गिफ्ट दिलं आहे. आजपर्यंत कोणत्या कोणत्या अब्जाधीशाने आपल्या मुलं आणि नातवांना काय काय गिफ्ट दिलं त्यावर आपण नजर टाकणार आहोत.
नारायण मूर्तींकडून अब्जावधीचे शेअर
इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी आपल्या सहा महिन्याच्या नातवाला 250 कोटी रुपये मूल्यांचे 15 लाख शेअर दिले आहेत. त्यांच्या नातवाचं नाव एकाग्र रोहन मूर्ती आहे. एकाग्र हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णना यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 10 नोव्हेंबर 2023 रोजी बंगळुरू येथे झाला.
नीता अंबानींकडून श्लोकाला 451 कोटींचा हार
श्लोका मेहता ही मुकेश आणि नीता अंबानी यांची मोठी सून आहे. आकाश अंबानी यांची श्लोका पत्नी आहे. नीता अंबानी यांनी आपल्या या सूनेला एक महागडा हार गिफ्ट दिला होता. या हारची किंमत 451 रुपये आहे. या हारमध्ये 407.48 कॅरेटचे येलो डायमंड आणि 18 कॅरेटचे रोज गोल्ड जडीत 229.52 कॅरेटच्या सफेद हिऱ्याचा सेट लावलेला आहे.
पूनावाला ने दिला बॅटमोबाईल
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी त्यांच्या मुलाला बॅटमोबाईल गिफ्ट म्हणून दिला. अदार पूनावा यांच्या मुलाचा 2015मध्ये सहावा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी हे गिफ्ट दिलं होतं. त्यांनी मर्सिडिज बेंज एस क्लासला डिजायनर बॅटमोबाईलमध्ये बदललं होतं.
शिव नादर यांच्याकडून 115 कोटीचं घर गिफ्ट
2014 मध्ये एचसीएलचे संस्थापक आणि चेयरमन शिव नादर यांनी आपली एकूलती एक मुलगी आणि वारसदार रोशनी यांच्यासाठी 115 कोटीचं घर खरेदी केलं. त्यावेळी दिल्लीतील ही सर्वात मोठी घर खरेदी होती. हे घर पूर्व दिल्लीतील फ्रेंडस कॉलनीत आहे.
ईशा अंबानी यांना 450 कोटीचा गुलिटा
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचा विवाह अब्जाधीश आनंद पिरामल यांच्याशी झाला होता. या जोडप्याला पिरामल कुटुंबाने मुंबईत गुलिटा नावाचं एक लक्झरी घर भेट म्हणून दिलं होतं. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या अँटालियाच्या जवळच गुलिटा आहे. त्याची किंमत जवळपास 450 कोटी आहे.