Share Market | लाल रंग काही सोडवेना! शेअर बाजार कोसळला
Share Market | शेअर बाजार बुधवारी जोरदार आपटला. गेल्या आठवड्यात पण शेअर बाजाराचा रडीचा डाव सुरु होता. या आठवड्यात पण बाजाराला लाल रंगाची भुरळ पडली आहे. बुधवारी शेअर बाजारात पडझड झाली. सेन्सेक्स 522 अंकांनी खाली आला. बीएसई 64,049 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 155 अंकांची घसरण झाली. निफ्टी 19,126 अंकावर बंद झाला.
नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : या आठवड्यात सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार (Share Market) गडगडला. बाजारात आज गॅप भरुन काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न झाला. पण त्याला काही यश आले नाही. नफा वसुलीने बाजारात घसरणीचे सत्र सुरु झाले. त्यामुळे बाजार एका बाजूला झुकला आणि पडझड काही थांबली नाही. बुधवारच्या सत्रात तीनही बेंचमार्क निर्देशांकात मोठी विक्री झाली. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये घसरण दिसून आली. 522 अंकांनी खाली आल्याने बीएसई 64,049 अंकावर बंद झाला. तर निफ्टीला 155 अंकांचा फटका बसला. हा निर्देशांक 19,126 अंकावर बंद झाला.
या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण
बाजार बंद होताना निफ्टीमधील 50 शेअरपैकी 40 शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. तर केवळ 10 शेअर तेजीत होते. निफ्टी-50 च्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण एपोलो हॉस्पिटल, अदानी एंटरप्राईजेस, एसबीआय लाईफ, सिप्ला आणि आयशर मोटर्समध्ये नोंदविण्यात आली. तर टाटा स्टील, कोल इंडिया, हिंडाल्को, टाटा कंझ्युमर आणि एसबीआय शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.
या दोघांनी सावरली बाजू
निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी मेटल या दोन सेक्टोरल निर्देशांकांनी तेवढी बाजू सावरली. इतर सेक्टरमध्ये मोठी घसरण आली. सर्वाधिक घसरण निफ्टी मीडिया दिसून आली. या सेक्टरमध्ये 1.66 टक्क्यांची घसरण आली. निफ्टी आयटीमध्ये 1.03 टक्के, निफ्टी फायनेन्शिअलमध्ये 1.15 टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत 0.99 टक्के आणि निफ्टी हेल्थकेअरमध्ये 0.98 टक्के पडझड झाली.
गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
बाजारातील घसरणीमुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये मोठी कमी आली आहे. आज बाजार बंद होताना बीएसई मार्केट कॅप 309.33 लाख कोटी रुपयांवर आले. तर गेल्या ट्रेडिंग सत्रात हे मार्केट कॅप 311.30 लाख कोटी रुपये होते. म्हणजे गुंतवणूकदारांना 2 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
घसरणीचे कारण तरी काय
इस्त्राईल आणि हमास युद्ध अजून लवकर थांबण्याची चिन्हं नाहीत. या युद्धात इतर देश उडी घेण्याची भीती वाढत आहे. इराण, तुर्की या युद्धात केव्हा पण उडी घेण्याची भीती आहे. त्यामुळे शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहे. कच्चे तेल रंग दाखवू शकते. कच्चा तेलाचे भाव गगनाला भीडण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील स्थितीचा, तिथल्या आर्थिक घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे बाजार गडगडला आहे.