यंदा भारतीयांना तब्बल इतक्या कोटींची ‘मनीऑर्डर’ आली, आकडा ऐकून हैराण व्हाल
भारतातून सर्वाधिक कामगार नोकरीसाठी परदेशात जातात. संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये मोठ्या संख्येने कामगार नोकरीसाठी राहतात अशीही माहीती उघड झाली आहे.
विविध देशात नोकरी निमित्त राहणाऱ्या भारतीयांनी साल 2023 मध्ये 10 लाख कोटी रुपये भारतात आपल्या नातेवाईकांना पाठवले आहेत. ही रक्कम जगातील सर्वाधिक रक्कम आहे. जागतिक बँकेने ही माहिती दिली आहे. परदेशात कमावलेला पैसा आपल्या मातृभूमीला परत पाठवण्यात मेक्सिकोचा दुसरा क्रमांक आला आहे. मेक्सिकोच्या लोकांनी 5 लाख कोटी रुपये आपल्या देशात पाठवले आहेत. तर या यादीत चीनचा तिसरा क्रमांक असून चीनच्या जगभरात राहणाऱ्या लोकांनी 4 लाख कोटी रुपये चीनला पाठविले आहेत. फिलिपाइन्स 3 लाख कोटी रुपये पाठवून चौथ्या आणि पाकिस्तान 2.2 लाख कोटी रुपये पाठवून पाचव्या स्थानावर आहे. कमी उत्पन्न असलेल्या आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील स्थलांतरितांनी आपल्या मातृभूमीतील आई-वडील तसेच नातलगांना हे पैसे पाठवले आहेत.
पाकिस्तानी स्थलांतरितांनी 12% कमी पैसे पाठवले
साल 2022 मध्येही अनिवासी भारतीय पैसे घरी पाठवण्यात सर्वात आघाडीवर होते. त्यानंतर 9.28 लाख कोटी रुपये भारतात पाठवण्यात आले. 2022 मध्ये पाकिस्तानने अडीच लाख कोटी रुपये पाठवले होते. एका वर्षानंतर त्यात 12% ची घट झाली आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, 2021 नंतर भारतीय स्थलांतरितांनी गेल्यावर्षी सर्वाधिक रक्कम आपल्या मातृभूमीत पाठवली होती.
अमेरिकेतील कामगारांच्या वाढत्या मागणीमुळे भारतीय अधिक प्रमाणात अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे हेच भारतीय आपल्या घरी जादा पैसे पाठवू शकत आहेत असे जागतिक बँकेने म्हटले आहे. तसेच मध्यपूर्वेतील देशांमध्येही कुशल आणि कमी कुशल कामगारांची मागणी वाढत आहे. पाश्चात्य देशांनंतर बहुतांश भारतीय कामाच्या शोधासाठी मध्यपूर्वेतील देशात जात आहेत.
UAE मध्ये UPI लाँच झाल्यामुळे वाढ
भारतात सर्वाधिक पैसा अमेरिकेतून आला आहे. त्यानंतर UAE मधून 18% पैसे भारतात पाठविले गेले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये UAE मध्ये UPI द्वारे पेमेंट सेवा सुरू झाल्यानंतर पैसे पाठविण्यात सर्वात मोठी वाढ झाली. त्यामुळे लोकांना भारतात पैसे पाठवणे सोपे झाले असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
मध्यपूर्वेतील संयुक्त अरब अमिराती ( UAE ) या देशानंतर भारतात पैसे पाठविण्यात सौदी अरेबिया, कुवेत, ओमान आणि कतार या देशातील कामगारांचा नंबर लागत आहे. जो 2023 मध्ये आलेल्या एकूण पैशांपैकी सुमारे 11% इतका होता. 2024 मध्ये हा आकडा 3.7% ने वाढून 10.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. त्याच वेळी, 2025 मध्ये ही रक्कम 4% ने वाढून 10.7 लाख होईल असे म्हटले जात आहे.
आखाती देश प्रमुख डेस्टीनेशन
आखाती देश स्थलांतरित कामगारांसाठी एक प्रमुख डेस्टीनेशन बनले आहे. विशेषत: भारत, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, केनिया येथील कामगार आखाती देशात जात आहेत, जिथे ते उत्पादन, हॉस्पिटॅलिटी, सुरक्षा आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करतात.