Iran-Israel War : शेअर बाजार कोसळला, इराण- इस्त्रायल युद्धाचा थेट परिणाम, सेन्सेक्स 850 अंकांनी आपटला
Stock Market Crash : इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाचे ढग गडद होताच, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आज सेन्सेक्स उघडताच धराशायी झाला. 2 ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर गुरुवारी शेअर बाजार उघडल्यावर Sensex मध्ये 850 अंकांची घसरण दिसली.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष वाढला आहे. हमासनंतर आता इस्त्रायलने हिजबुल्लाह आणि इराणविरोधात मोर्चा उघडला आहे. त्याचे परिणाम जगभरात दिसून येत आहे. 2 ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर गुरुवारी शेअर बाजार उघडल्यावर Sensex मध्ये 850 अंकांची घसरण दिसली. शेअर बाजारात घसरण येण्याचा गुंतवणूकदारांना अंदाज होताच. पण ऐन सणासुदीत सेन्सेक्सची वाताहत अनेकांना नाराज करणारी ठरली. युद्धाचे ढग जितके गडद होतील, तितका शेअर बाजार गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळवणार आहे. आज NSE Nifty मध्ये 250 अंकांपेक्षा अधिकची घसरणी दिसली.
तिकडे बॉम्ब हल्ले, इकडे बाजारात धडामधूम
भारतीय शेअर बाजाराला इराण-इस्त्रायल युद्धाची झळ बसली. गुरूवारी बाजार उघडताच कोसळला. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 995.92 अंकांनी आपटला. सेन्सेक्स 83,270.37 अंकांवर उघडला. तर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने 269.80 अंकांची घसरण नोंदवली. Nifty सध्या 182.20 अंकांच्या घसरणीसह सध्या 25,618.45 अंकांवर व्यापार करत आहे. बाजारात उघडताचा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घसरला.
शेअर बाजार धास्तीत
या मंगळवारी इराणने इस्त्रायलवर हल्ला चढवला. त्यामुळे आता युद्ध भडकण्याची जोरदार शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम कच्चा तेलाच्या किंमतींवर दिसून आला आहे. क्रूड ऑईल महागले आहे. बुधवारी गांधी जंयतीची सुट्टी होती. त्यामुळे शेअर बाजार बंद होता. आज भारतीय शेअर बाजार उघडला. तेव्हा इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम दिसून आला. BSE Sensex सोमवारी 84,266 अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर तो 850 ते 995.92 अंकांपर्यंत गडगडला.
आज बाजाराचे व्यापारी सत्र सुरू झाले. तेव्हा जवळपास 620 शेअरमध्ये तेजीचे वारे होते. तर 2024 कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार घसरण दिसली. हे शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. तर 149 शेअरमध्ये कुठलाच बदल दिसला नाही. बाजारात टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टाटा कंझ्युमर, हिरो मोटोकॉर्प आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरने लवकर मान टाकली.
बाजारात अगोदरच घसरणीचे संकेत
युद्धाच्या धामधुमीत शेअर बाजारात मोठी गडबड होईल, याचे संकेत अगोदरच मिळाले होते. अमेरिकन बाजाराने कालच घसरण नोंदवली होती. त्यामुळे आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. आज प्री-ओपन मार्केटमध्येच बाजाराने रंग दाखवला. बाजारात मोठी घसरण आली. बाजार पूर्व व्यापारी सत्रात सेन्सेक्स 1200 अंकानी गडगडल्याचे दिसले.