फक्त अदानीच नाही तर 36 कंपन्यांमध्ये LIC ची गुंतवणूक, सहा महिन्यांत 58 टक्के नुकसान
अदानी यांच्या पाच कंपन्यांमध्ये एलआयसीची 9 टक्के हिस्सेदारी आहे. परंतु अदानी ग्रुपच नाही एकूण 36 कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे.
मुंबई : अमेरिकेतून हिंडेनबर्ग नावाचे वादळ येते अन् भारतात गौतम अदानींचे (Gautam Adani) संपूर्ण साम्राज्य हादरून जाते. संसदेपासून शेअर मार्केटपर्यंत फक्त अदानींचीच चर्चा होत आहे. गौतम अदानी यांच्या ग्रुपमध्ये भारताची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी, एलआयसीने (LIC) मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी यांच्या पाच कंपन्यांमध्ये एलआयसीची 9 टक्के हिस्सेदारी आहे. परंतु अदानी ग्रुपच नाही एकूण 36 कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे. गेल्या सहा महिन्यांत एलआयसीच्या गुंतवणुकीत 58 टक्के घसरण झाली आहे.
अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) एका अहवालाने अदानी समूहाला हादरा दिला आहे.
एलआयसी गुंतवणुकीचा मुद्दा आता संसदेत उठवला जात आहे. विरोधकांनी अदानी समूहात गुंतवणूक करण्याच्या एलआयसीच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु अदानी ग्रुप ही एकमेव कंपनी नाही जिथून एलआयसीचा नफा कमी झाला आहे. तर गेल्या सहा महिन्यांत एलआयसीनी केलेल्या गुंतवणुकीवरील नफा कमी झाला आहे.
36 कंपन्यांत नुकसान
LIC चा हिस्सा 36 कंपन्यांमध्ये आहेत. गेल्या सहा महिन्यांत यातील शेअर्सची किंमत 20 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. तज्ज्ञांनुसार, एलआयसीच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यातील अल्प कालवधीत मुल्यमापन करता येणार नाही.शेअर बाजारात एलआयसी दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नामांकित कंपन्यांमध्ये LIC ने गुंतवणूक केली आहे.
कोणत्या कंपन्यांमध्ये नुकसान
‘Ace Equity’ च्या डाटानुसार, LIC चे अनेक कंपन्यांमधील शेअरचे मूल्य गेल्या सहा महिन्यांत 58 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. यामध्ये फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स, पिरामल एंटरप्रायजेस, ओमॅक्स, इंडस टॉवर्स, लॉरस लॅब्स, जेट एअरवेज (इंडिया), सनटेक रियल्टी, बॉम्बे डाईंग, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर, अरबिंदो फार्मा आणि जेपी इन्फ्राटेक यांचा समावेश आहे.
अदानींच्या कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
एलआयसीने अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि इकॉनॉमिक झोन आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर अदानी समूहाच्या या सर्व कंपन्या एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक तोट्यात आहेत. एलआयसीकडे अदानी पोर्ट्समध्ये 9.14 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.23 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.65 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 1.28 टक्के हिस्सा आहे.
एलआयसीची गुंतवणूक असणाऱ्या १० मोठ्या कंपन्या
- IDBI (49.24 टक्के)
- LIC हाउसिंग फायनान्स (45.24 टक्के)
- स्टँडर्ड बॅटरीज (19.99 टक्के)
- मॉडेला वूलन्स (17.31 टक्के)
- ITC (15.29 टक्के)
- NMDC (13.67 टक्के)
- महानगर टेलिफोन निगम (13.25 टक्के)
- ग्लोस्टर (12.85 टक्के)
- लार्सन अँड टुब्रो (12.50 टक्के)
- सिम्प्लेक्स रियल्टी (12.38 टक्के).