Reliance : या जागतिक ब्रँडच्या भारतातील व्यवसायावर रिलायन्सची मालकी, मुकेश अंबानी यांनी मोजले 2850 कोटी, असा होईल फायदा
Reliance : रिलायन्सने मोठी डील करत या जागतिक ब्रँडची भारतातील स्टोअर खिशात घातली आहेत..
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Limited) मोठी खरेदी केली आहे. रिलायन्सचा व्यवसाय दिवसागणिक वाढत आहे. कंपनीचे चेअरमन आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी डील केली आहे. अंबानी यांनी जर्मनीतील सर्वात मोठी रिटेल विक्रेता कंपनी मेट्रो एजी (Metro AG) हिचा भारतातील व्यवसाय खिशात घातला आहे. त्यासाठी रिलायन्सने 2,849 कोटी रुपयांचा करार केला आहे.
रिटेल सेक्टरमध्ये इतर समूहांना टक्कर देण्यासाठी हा करार रिलायन्सच्या पथ्यावर पडणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स लवकरच मेट्रो एजीचा भारतातील सर्व व्यवसाय ताब्यात घेईल. लवकरच ही संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचा रिलायन्सच्या विस्तारीकरणाला मोठा फायदा होईल.
रिलायन्सची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) एकूण 344 दशलक्ष डॉलरचा करार केला आहे. त्यातंर्गत मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Metro India) मध्ये संपूर्ण भागीदारी मिळेल. त्यामुळे रिलायन्सचा व्यवसायात वाढ होण्यास मदत होईल.
करारानुसार, जर्मनीच्या उद्योग समूहाची भारतातील 31 घाऊक वितरण केंद्र, भूमी बँक आणि मेट्रो कॅश अँड कॅरी (Cash and Carry) ची मालकी रिलायन्स समूहाकडे येईल.पण अजून या डीलविषयी दोन्ही कंपन्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
रिलायन्सचे देशात 16,600 पेक्षा अधिक स्टोअर आहेत. त्याआधारे रिलायन्स किरकोळ विक्रीत अग्रेसर कंपनी आहे. Reliance Retail च्या संचालिका ईशा अंबानी यांनी सांगितले की ही खरेदी एक धोरणाच भाग आहे. भविष्यातील वृद्धीसाठी ही डील करण्यात आलेली आहे.
मेट्रो इंडिया भारतीय B2B बाजारातील दिग्गज खेळाडू आहे. त्यांच्याकडे मोठा ग्राहक वर्ग आहे. त्याचा फायदा रिलायन्स समूहाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा कंपनीचा संपूर्ण व्यवसाय आणि रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात येईल.