Adani Ambani : अदाणी-अंबानीच नाही तर केंद्र सरकारही मैदानात, ही कंपनी खरेदी करण्यासाठी जोरदार रस्सीखेच, या कंपनीत असं आहे तरी काय?
Adani Ambani : अदाणी आणि अंबानी समूहात काही कंपन्या विकत घेण्यावरुन स्पर्धा सुरु आहे..त्यात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात व्यावसायिक स्पर्धा सर्वश्रुत आहे. एका कंपनीसाठी या दोन्ही समूहामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असताना, आता केंद्र सरकारने (Central Government) ही कंपनी खरेदी करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत.
दिवाळं निघालेल्या या कंपनीला विकत घेण्यासाठी केंद्र सरकारने ही बोली प्रक्रियेत उडी घेतली आहे. या कंपनीचा लिलाव 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी सर्वच इच्छुक आहे. अखेर या कंपनीत असे काय विशेष आहे?
अमरकंटक पॉवर (Lanco Amarkantak Power) असे या कंपनीचे नाव आहे. मीडिया अहवालानुसार, ही एक थर्मल पॉवर कंपनी आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीत निघाली असून तिच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे.
हे पहिल्यांदाच समोर आले की, देशातील दिग्गज समूह एकच कंपनी खरेदीसाठी पुढे आले आहेत. त्याचवेळी या कंपनीत केंद्र सरकारने ही रुची दाखवली आहे. केंद्र सरकारही या कंपनीच्या बोली प्रक्रियेत सहभागी झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिजने या कंपनीसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली तर रिलायन्सच्या ताफ्यात एक थर्मल पॉवर कंपनी जोडल्या जाईल. पहिल्या फेरीत रिलायन्स समूहच सर्वाधिक बोली लावणारा आहे.
तर ही कंपनी खरेदी करण्यासाठी अदाणी समूह पण मागे नाही. दुसऱ्या फेरीत या अदाणी समूहाने आघाडी घेतली आहे. अदाणी समूहाने 2950 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
या सर्व प्रक्रियेत सरकारी कंपन्या मागे नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत बोली लावण्यात सरकारी कंपन्या तिसऱ्या स्थानी आहेत. अदाणी समूह 1800 कोटी रुपये अगोदर देण्याच्या तयारीत आहे, तर उर्वरीत 1150 कोटी रुपये 5 वर्षांत देण्यात येतील.
अमरकंट कंपनीची विक्री प्रक्रिया या वर्षी जानेवारीपासून सुरु आहे. कंपनीचा प्रकल्प सध्या छत्तीसगड राज्यातील कोरबा-चांपा राजमार्गावर आहे. या कंपनीकडे कोळसाआधारीत थर्मल पॉवर प्रकल्प आहे.