Health Insurance : आता जीवन विमा कंपन्यांना मिळणार आरोग्य विमा विकण्याची परवानगी; आरोग्य विमा स्वस्त होणार!
आरोग्य विमा (Health Insurance) पॉलिसी आता स्वस्त होऊ शकतात. तसंच या पॉलिसीवर चांगल्या सुविधा देखील मिळू शकतात. देशात आरोग्यविम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी इरडाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य विमा पॉलिसी आता स्वस्त होऊ शकतात. तसंच या पॉलिसीवर चांगल्या सुविधा देखील मिळू शकतात.देशात आरोग्यविम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी Insurance Development Regulatory Authority म्हणजेच इरडा जीवन विमा कंपन्यांना आरोग्य विमा (Health Insurance) विकण्याची परवानगी देणार आहे.जीवन विमा (Life insurance) कंपन्यांना आरोग्य विमा विकण्याची परवानगी दिल्यानंतर विमा स्वस्त होऊ शकतो, तसेच त्याची व्याप्तीही वाढू शकते.सध्या देशात विमा (Insurance) काढण्याचे प्रमाण खूप कमी आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतातील 42 कोटी लोकांकडे आरोग्य विमा नाही. म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के लोकांकडे आरोग्य कवच नाही. 2020-21 मध्ये केवळ एकूण लोकसंख्येच्या 4.2 टक्के लोकांनीच विमा काढला. यापैकी 3.2 टक्के लोकांनी जीवन विमा आणि 1 टक्के लोकांनी नॉन लाईफ इन्शुरन्स योजना खरेदी केल्या आहेत, अशी माहिती निती आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. बिगर जीवन विमा योजनेमध्ये आरोग्य विमा, कार विमा आणि इतर विमा पॉलिसीचा समावेश होतो.
आरोग्य विमा पॉलिसीची संख्या कशी वाढेल ?
जीवन विमा कंपन्यांना आरोग्य विमा विकण्याची परवानगी दिल्यास,आरोग्य विम्याची व्याप्ती वाढू शकते. याचं मुख्य कारण म्हणजे जीवन विमा कंपन्यांकडे खूप मोठा ग्राहकवर्ग आहे, तसेच त्यांची वितरण व्यवस्थाही मजबूत आहे. जीवन विमा कंपन्या आरोग्य विमा क्षेत्रात आल्यास स्पर्धाही वाढेल. स्पर्धा वाढल्यानंतर ग्राहक हा राजा होतो. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमा कंपन्या या आकर्षक आणि स्वस्त आरोग्य विमा बाजारात आणू शकतात.IRDA च्या आकडेवारीनुसार जीवन विमा कंपन्यांचे 25 लाखांहून अधिक एजंट आहेत. तसेच या कंपन्यांनी विमा पॉलिसी विकण्यासाठी 500 हून अधिक कॉर्पोरेट एजंट सोबत टायअप देखील केले आहे.
प्रीमियम दहा टक्क्यांनी कमी होणार
आयुर्विमा विकणाऱ्या एजंटचा संपर्क मोठा असतो. तसेच या कंपन्यांकडे ग्राहकांच्या आरोग्याचा तपशीलाच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जीवन विमा कंपन्या आकर्षक आरोग्य विमा योजना बाजारात आणतील. सध्या बाजारात असलेल्या बेसिक आरोग्य विमा योजनेपेक्षा या विम्याचा प्रीमियम दहा टक्क्यांनी स्वस्त असू शकतो. सध्या 18 ते 50 वर्ष वयोगटातील निरोगी व्यक्तीसाठी 2 लाख रुपयांच्या मेडीक्लेम पॉलिसीसाठी वार्षिक प्रीमियम 5 ते 7 हजार रुपये आहे. IRDA चे नियमाप्रमाणं योजना यशस्वी झाल्यास आरोग्य विम्याचा प्रीमियम 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे इन्शुरन्स एक्स्पर्ट विकास सिंघल यांनी म्हटले आहे.
आरोग्याशी संबंधित खर्च
एका अहवालानुसार देशातील आरोग्याशी संबंधित 70 टक्के खर्च लोक स्वतःच्या खिशातून करतात. त्यामुळे त्यांच्या बचतीवर परिणाम होतो. IRDA च्या नवीन नियमांमुळे विमा क्षेत्रातील स्पर्धा वाढून त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. अशी योजना याआधी सुद्धा लागू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता.परंतु आरोग्य विमा कंपन्यांच्या विरोधामुळे ही योजना बारगळली.