स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; बँक ऑफ बडोदाकडून गहान संपत्तीचा लिलाव
तुम्ही जर स्वस्त घर खरेदीची संधी शोधत असाल तर अशी संधी तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेच्या वतीने आज लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : जर तुम्ही देखील स्वस्त घर, दुकान खरेदीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून (Bank of Baroda) स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज बँक ऑफ बडोदाच्या वतीने संपत्तीच्या लिलावाला (Mega E-Auction) सुरुवात झाली आहे. तुम्ही देखील या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन स्वस्तात घर आणि इतर मालमत्ता खरेदी करू शकता. बँक ऑफ बडोदाकडून वेगवेगळ्या किमतींच्या संपत्तीचा लीलाव करण्यात येत आहे. बँकेने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकेच्या वतीने आज दिनांक 12 मे 2022 रोजी बँकेकडे (Bank) गहान असलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात वेगवेगळ्या किमतींचे घरे, दुकाने आणि जागा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार घराची खरेदी करू शकतात. खरेदी केल्यानंतर लवकरच बँकेच्या वतीने संबंधित ग्राहकाला त्या घराचा ताबा देण्यात येईल.
बँकेकडून ‘या’ संपत्तीचा लिलाव
अनेक जण बँकेकडून कर्ज घेत असतात. कर्जाच्या मोबदल्यात बँकेकडे तारण म्हणून संपत्ती गहान ठेवली जाते. या संपत्तीमध्ये घर, जागा, दुकान, जमीन अशा कोणत्याही संपत्तीचा समावेश असू शकतो. संपत्ती गहान ठेवून कर्ज घेतले जाते. मात्र अनेकदा काही कारणांमुळे कर्जाची परतफेड होत नाही. कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने बँकेकडून अशा कर्जदाराची संपत्ती जप्त केली जाते. जप्त केलेल्या संपत्तीचा कालांतराने लिलाव केला जातो. लिलावातून आलेल्या पैशांतून बँकेचे कर्ज वसूल केले जाते. बँक ऑफ बडोदाकडून देखील आज अशाच संपत्तीचा लिलाव सुरू आहे. बँकेच्या अधिकृत साईटवर जाऊन आपण या लिलावाबाबत अधिक माहिती घेऊ शकतात, तसेच लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी देखील होऊ शकतात.
वेगवेगळ्या शहरात संपत्ती
बँक ऑफ बडोदाकडून आज ज्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. त्या संपत्तीचे मुख्य वैशिष्ट म्हणजे ही संपत्ती वेगवेगळ शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मनपसंत शहरात संपत्तीची खरेदी करू शकता. विशेष म्हणजे घर आणि जमिनीच्या किमती वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार घराची खरेदी करू शकता. जास्तीत जास्त ग्राहकांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.