कर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक आक्रमक, 31 मे रोजी ‘नो पर्चेस डे’, इंधनाचा तुटवडा जाणवणार?
पेट्रोल, डिझेल दर कपातीविरोधात आता पेट्रोल पंप चालक - मालक आक्रमक झालेत. केंद्र आणि राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने कर कपात केल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे.
मुंबई : पेट्रोल, डिझेल दर (Petrol, diesel rates) कपातीविरोधात आता पेट्रोल पंप चालक – मालक आक्रमक झालेत. केंद्र आणि राज्य सरकारने (State Government) चुकीच्या पद्धतीने कर कपात केल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे. या विरोधात फामपेडा (Phampeda) संघटनेनी ‘नो पर्चेस’चा निर्णय घेतलाय. 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलची खरेदी केली जाणार नाहीये, काल झालेल्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 31 मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलची खरेदी केली जाणार नाही. आदल्या दिवशीचा जो शिल्लक साठा आहे, त्याच इंधनाची विक्री केली जाणार आहे. अचानक केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कर कपतीमुळे चालक – मालकांचे हजारो कोटींचे नुकसान झालंय. पूर्वकल्पना किंवा कोणतेही नियोजन न करता कर कपात केल्याने पेट्रोल पंप चालक – मालकांमध्ये नाराजी आहे. संपूर्ण देशभरातील पेट्रोल – डिझेल पंप चालक मालक नो पर्चेसमध्ये सहभागी होणार असल्याचे देखील यावेळी लोध यांनी म्हटले आहे.
31 मे ला इंधनाचा तुटवडा ?
गेल्या आठवड्यात शनिवारी केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच राज्य सरकारने देखील व्हॅट कमी केला. केंद्र आणि राज्याच्या कर कपातीच्या धोरणावर पेट्रोल पंप व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चुकीच्या पद्धतीने कर कपात करण्यात आल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. कुठलीही पूर्णकल्पना न देता कर कपात करण्यात आल्याने मोठे नुकसान झाल्याचे फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी म्हटले आहे. याचा निषेध करण्यासाठी 31 मे रोजी पेट्रोल पंप चालक इंधन खरेदी करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
कर कपातीनंतर पेट्रोल, डिझेल स्वस्त
केंद्र सरकारने वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी गेल्या शनिवारी पेट्रोल, डिझेलच्या अबकारी करात कपात केली होती. केंद्राने अबकारी करात कपात केल्याने पेट्रोलचा दर प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचा दर सात रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यानंतर लगेचच राज्याने देखील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही कर कपात चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असा आरोप फामपेडाच्या वतीने करण्यात आला आहे.