रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, ICU मध्ये उपचार सुरु
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोललं जात आहे. सध्या रतन टाटांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना काल रात्री उशिरा रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रतन टाटा यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत.
रतन टाटा यांचा रात्री उशिरा रक्तदाब कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर आता रतन टाटा यांनी स्वत: त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर माहिती दिली.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
रतन टाटा यांनी नुकतंच ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही. त्यामुळे कोणीही कोणतीही चुकीची माहिती पसवरू नये,” असे रतन टाटा यांनी म्हटले.
दरम्यान टाटा उद्योगसमूह आणि त्याचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याबद्दल सर्व भारतीयांना एक विशेष स्थान आहे. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच चर्चांना उधाण आले होते. मात्र आता त्यांनी पोस्ट करत प्रकृतीबद्दलची एक अपडेट दिली आहे.