Income Tax ची मिळाली नोटीस? मग करणार काय, एका क्लिकवर उपाय
Income Tax Notice : आयटीआर भरल्यानंतर आयकर खात्याची नोटीस आली तर अनेक जण तिला फार गांभीर्याने घेत नाहीत अथवा काही जण गोंधळून जातात. आयकर खात्याची सेक्शन 143(1) अंतर्गत नोटीस आल्यास काय कराल? त्याला कसं उत्तर द्याल? जाणून घ्या एका क्लिकवर...
आयकर रिटर्न (ITR) दाखल केल्यानंतर, आयकर खाते काही जणांना माहितीची तपासणी करण्यासाठी अथवा स्पष्टीकरणासाठी एक नोटीस वा इंटिमेशन पाठवते. आयकर अधिनियमाच्या कलम 143(1) अंतर्गत हे सूचना देण्यात येते. त्याआधारे तुम्ही आयटीआर भरताना दिलेली माहिती आणि विभागाकडे प्राप्त माहिती याचा पडताळा करण्यात येतो. अशी नोटीस मिळाल्यानंतर काही जण गोंधळून जातात तर काही जण त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आयकर खात्याची सेक्शन 143(1) अंतर्गत नोटीस आल्यास काय कराल? त्याला कसं उत्तर द्याल?
या गोष्टी एकदा घ्या तपासून
आयकर अधिनियमाच्या कलम 143(1) अंतर्गत दिलेल्या नोटीसमध्ये उत्पन्न, कपात आणि कराची गोळाबेरीज असते. तुम्ही दिलेली माहिती आणि विभागाकडील माहितीचा पडताळा याद्वारे घेण्यात येतो.
स्वतःची माहिती वाचा : नोटीस आल्यावर त्यावरील नाव, पत्ता आणि PAN क्रमांक योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्या
उत्पन्न आणि कर कपात : तुम्ही आयटीआरमध्ये दिलेले उत्पन्न आणि विभागाने मोजलेले उत्पन्न यांची माहिती एका टेबलमध्ये करण्यात येते. या दोन्ही उत्पन्नात काही तफावत आढळते का हे तपासा.
कर तपशील तपासा : नोटीसमध्ये कर दायित्व, कर सवलत, व्याज (कलम 234A, 234B, 234C), आणि विलंब शुल्क (कलम 234F) ची माहिती तपासा
काय असू शकते या नोटीसमध्ये?
1. अतिरिक्त कर देण्याची गरज नाही : तुमचे कराचे गणित मेळ खात असेल तर या नोटीसमध्ये दायित्व आणि रिफंड शून्य दाखवण्यात येईल.
2. अतिरिक्त कराची मागणी : जर तुम्ही तुमचे उत्पन्न आणि कर सवलतीची माहिती दिली असेल, पण ही माहिती आयकर विभागाच्या माहितीशी जुळत नसले तर आयकर खाते अतिरिक्त कर आणि व्याजाची मागणी करू शकते.
3. तुम्हाला रिफंड मिळेल : जर तुम्ही अधिक कर दिला असेल तर प्राप्तिकर खाते तुम्हाला ही रक्कम रिफंड करेल. त्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात येईल.
या नोटीसला उत्तर कसं देणार?
आयकर अधिनियमाच्या कलम 143(1) अंतर्गत आयकर खाते नोटीस देईल. त्याला उत्तर देताना काही गोष्टींची खात्री करून घ्या आणि या गोष्टींकडे लक्ष द्या.
तुम्हाला आयकर खात्याने नोटीस का पाठवली ते समजून घ्या
तुमच्या उत्तरात योग्य स्पष्टीकरण आणि पुराव्या खातर दस्तावेज जोडा
नोटीसमध्ये उल्लेखित तारखेपर्यंत तुमचे उत्तर ऑनलाईन पद्धतीने आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर दाखल करा.
तुम्ही जे उत्तर दिले आणि जी काही कागदपत्रं जमा केली, त्याची फोटोकॉपी तुमच्याकडे पण सुरक्षित ठेवा
या कामासाठी तुम्ही तज्ज्ञाची मदत, सल्ला घेऊ शकता