Stock : या आठवड्यात शेअर बाजाराची काय असेल दिशा..कायम राहील तेजीचे सत्र की गुंतवणूकदार होतील हैराण..
Stock : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उताराचे सत्र आहे..
नवी दिल्ली : शेअर बाजाराची (Share Market) दिशा या आठवड्यात सुक्ष्म आर्थिक डाटा आणि जागतिक संकेतावर ठरणार आहे. विश्लेषकांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, या आठवड्यात वाहन विक्रीचे आकडे जाहीर होतील. त्यावरुन बाजाराची दिशा स्पष्ट होईल. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) विक्री आणि कच्चा तेलाच्या किंमतीतील (Crude Oil Price) घट यावर बाजाराची दिशा समोर येईल.
गेल्या आठवड्यात कच्चा तेलाच्या किंमती, परदेशी गुंतवणूकदारांची मानसिकता, त्यांची विक्री याआधारे बाजारात तेजी दिसून आली होती. गेल्या आठवड्यात BSE वरील 30 शेअरचा निर्देशांक 630.16 अंकांनी उसळला होता.
शुक्रवारी निर्देशांक 62,293.64 अंकावर बंद झाला. हा निर्देशांकाचा उच्चांकी स्तर आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (Nifty) 18,512.75 अंकांच्या उच्चस्तरावर बंद झाला. बाजारात गेल्या आठवड्यात कमालीची तेजी दिसून आली. तर काही शेअर्सनी मात्र निराशाजनक कामगिरी केली.
स्वस्तिका इन्वेस्टमार्टचे प्रमुख संतोष मीणा यांच्या दाव्यानुसार, राष्ट्रीय सकल उत्पादनात (GDP) दुसऱ्या तिमाहीचे आकडे मिळतील. तर वाहन विक्रीचे आकडेही समोर येतील. अमेरिकन धोरणे आणि डॉलर निर्देशांक यांचा ही परिणाम दिसून येईल.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. चीनमधील प्रमुख शहरात लॉकडाऊन लागला आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येईल. कच्चे तेल आणि सोन्याच्या आयतीसह इतर उत्पादनावरही त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
1 डिसेंबर रोजी वाहन विक्रीचे आकडे समोर येतील. तर दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचे आकडे बुधवारी येतील. त्याआधारे बाजाराची दिशा स्पष्ट होईल, असे रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना कमाईचा जबरदस्त संधी मिळणार आहे. पुढील आठवड्यात 1,000 कोटी रुपयांहून अधिकचे आयपीओ बाजारात दाखल होत आहे. तसेच धर्मज क्रॉप गार्ड आणि युनिपार्टस इंडियाचे आयपीओही बाजारात येत आहेत. या महिन्यात आठ कंपन्यांनी जवळपास 9,500 कोटी रुपये जमवले आहेत.