‘Meta’च्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा; फेसबुकला सोशल मीडियातील नंबर वन कंपनी बनवले, ‘या’ कारणांमुळे दिला राजीनामा
फेसबुकची मूळ कंपनी असेलेल्या 'मेटा'च्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी राजीनामा दिला आहे. त्या गेल्या चौदा वर्षांपासून फेसबुकसाठी काम करत होत्या.
!['Meta'च्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा; फेसबुकला सोशल मीडियातील नंबर वन कंपनी बनवले, 'या' कारणांमुळे दिला राजीनामा 'Meta'च्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा; फेसबुकला सोशल मीडियातील नंबर वन कंपनी बनवले, 'या' कारणांमुळे दिला राजीनामा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/02172310/FACEBOOK.jpg?w=1280)
जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी असेलेल्या ‘मेटा’च्या (Meta) सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी राजीनामा दिला आहे. शेरिल सँडबर्ग (Sheryl Sandberg) या गेली 14 वर्ष कंपनीच्या सीओओ पदावर कार्यरत होत्या. फेसबुकला एक सामान्य स्टार्टअप ते सोशल मीडिया क्षेत्रातील नंबर वन कंपनी बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. शेरिल सँडबर्ग यांनी 2008 साली कंपनी जॉईन केली होती. त्यानंतर चार वर्षांनी फेसबुक सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. शेरिल सँडबर्ग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता झेवियर ऑलिव्हन यांनी मेटाच्या सीओओ पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. फेसबुकला वाढवण्यात शेरिल सँडबर्ग यांचा मोठा वाटा होता. त्यांचे फेसबुकमध्ये किती मोठे योगदान होते याचा अंदाज आपल्याला या गोष्टीवरून येऊ शकतो की, मेटामध्ये मार्क झुकरबर्ग यांच्यानंतर शेरिल यांचाच आदेश अंतिम होता.
शेरिल यांच्यावर झालेले आरोप
शेरिल सँडबर्ग या फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या सीओओ होत्या. त्यांनी गेले चौदा वर्ष कंपनीमध्ये काम केले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यानंतर शेरिल याच कंपनींच्या सर्वोच्च अधिकारी होत्या. सुरुवातीला त्या फेसबुकच्या सीओओ म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्या मेटाच्या सीओओ बनल्या. फेसबुकला स्टार्टअप ते सोशल मीडियामधील एक प्रमुख कंपनी बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मात्र कंपनीच्या सीओओ पदावर असताना त्यांनी कंपनीच्या यशासाठी असे काही निर्णय घेतले की, त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली तसेच फेसबूकवर चुकीची आणि द्वेषपूर्ण माहिती पसरवल्याचाआरोप झाला. अखेर शेरिल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
फेसबुकपूर्वी गुगलमध्ये काम
2008 ला फेसबूक जॉइन करण्यापूर्वी शेरिल सँडबर्ग या गुगलसाठी काम करत होत्या. त्यांनी मेटाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की, मी जेव्हा 2008 मध्ये फेसबूक जॉइन केले तेव्हा कंपनीसाठी पाच वर्ष काम करेल असे ठरवले होते. मात्र मी या कंपनीत एका मोठ्या पदावर तब्बल 14 वर्ष काम केले. मात्र आता जीवनात एक नवा चाप्टर सुरू करण्याची वेळ आली आहे. शेरिल यांनी कंपनीच्या बिझनेस आणि जाहिरात व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत कंपनीला एका स्टार्टअप पासून वर्षाकाळी 100 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय करणारी कंपनी बनवले.