Stock Market Updates : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ, निफ्टी 16,300 च्या पार
आज शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण असून, शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये 500 पेक्षा अधिक अंकांची वाढ झाली तर निफ्टी देखील 16 हजार 300 च्या पार पोहोचली आहे.
BSE Nifty Sensex Market Latest News : जागतिक बाजारामधून मिळत असलेल्या सकारात्मक संकेताचा परिणाम शुक्रवारी आठवड्याच्या शेटवच्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर (Stock Market) झाल्याचे पहायला मिळाले. शेअर बाजारावरील विक्रीचा दबाव कमी होऊन, खरेदी वाढल्याने सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) उसळी घेतली. आयटी, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रात तेजी आल्याने शुक्रवारी सेन्सेक्स 500 अंकांपेक्षा अधिक वधारला तर निफ्टीने देखील 16,300 चा आकडा पार केला. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये सर्वाधिक 2.44 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. आयटी, ऑटो, बँकिंग या क्षेत्रासोबतच फार्मा, मेटल आणि एफएमसीजी कंपन्या देखील आज मजबूत स्थितीमध्ये पोहोचल्या आहेत. आज बीएसई लिस्टेड 30 शेअर्सपैकी 24 शेअर्समध्ये तेजी आहे. बजाज फायनान्स, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व, टेक महिंद्र, इन्फोसिस, मारुती, विप्रो या कंपन्या आजच्या टॉप गेनर्स कंपन्या आहेत. तर दुसरीकडे एनटीपीसी, नेस्ले इंडिया, पावर ग्रिड, एशियन पेंट्स या कंपन्याचे शेअर्स घसरले आहेत.
मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये वाढ
आज लार्ज कॅप शेअर्ससोबतच मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये देखील चांगली खरेदी दिसून आली. बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.27 टक्क्यांनी वाढला तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.65 टक्क्यांनी वाढला. आज शेअर बाजारात तेजी दिसत आहे. शेअर बाजारता तेजी दिसत असल्याने गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शेअर बाजारात मोठी पडझड दिसून येते. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आज खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
अमेरिकन बाजारात तेजी
गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाला. डाओ सलग पाचव्या दिवशी तेजीत राहिल्याने हिरव्या निशाणावर बंद झाला. डाओमध्ये गुरुवारी 516 अकांची वाढ झाली. गुरुवारी नेस्डॅकमध्ये देखील तेजी पहायला मिळाली. नेस्डॅक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह गुरुवारी बंद झाला. अमेरिकेसोबतच युरोपमधील शेअर बाजारात देखील तेजीचे वातावरण आहे. पडझडीनंतर युरोपमधील शेअर बाजार रिकव्हर होताना दिसत आहे.
रुपया घसरला
शुक्रवारी रुपयाची कमजोर सुरुवात झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी घसरला. चार पैशांच्या घसरणीसह रुपया 77.62 प्रति डॉलरवर पोहोचला आहे. गुरुवारी रुपया 77.58 प्रति डॉलरवर बंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. परिणामी महागाई वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.