Success story : शाळा अर्ध्यावरच सुटली हार नाही मानली; आज आहेत 25 कोटींच्या कंपनीचे मालक, देशी बर्गरला बनवले ब्रँड
या बँडची सुरुवात राजस्थानमधील जयपूरमधून झाली. विशेष म्हणजे शाळा सोडलेल्या दोन मुलांनी या 'बर्गर फार्म'ची सुरुवात केली. सुरुवातीला या दोघांनी मिळून आपल्या घरातीलच एका खोलीत बर्गर बनवायला सुरुवात केली.
जयपूर : फास्ट फूड (Fast food) हा आता आपल्या खाण्याच्या सवयींचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मॅकडोनाल्ड (McDonald’s), वेंडीज, बर्गर किंग, कार्ल्स जूनियर अशा अनेक मल्टीनॅशन रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण बर्गर (Burger) खाल्लेही असेल. मात्र तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारतामधील एक देशी बर्गर ब्रँड सध्या या विविध मल्टीनॅशनल ब्रँडला टक्कर देत आहे. या ब्रँडची सुरुवात राजस्थानमधील जयपूरमधून झाली. विशेष म्हणजे शाळा सोडलेल्या दोन मुलांनी या ‘बर्गर फार्म’ची सुरुवात केली. सुरुवातीला या दोघांनी मिळून आपल्या घरातीलच एका खोलीत बर्गर बनवायला सुरुवात केली. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. या बर्गरचे वैशिष्ट म्हणजे या बर्गरमध्ये फक्त भारतीय मसाले वापरण्यात येतात. आज बर्गर फार्ममध्ये बनणारे बर्गर एक ब्रँड बनले आहे. उच्च गुणवत्ता आणि किफायती दर यामुळे आज या बर्गर फार्मची उलाढाल कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे. दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येत वाढ होतच आहे.
बर्गर खाताना सूचली कल्पना
हे बर्गर फार्म सुरू करण्यामागची कहाणी मोठी रोचक आहे. मधूनच शाळा सोडलेले दोन मित्र परमवीर सिंह आणि रजत यांनी हे बर्गर फार्म सुरु केले. रजत आणि परमवीर सिंह यांची एका ट्यूशन सेंटरवर पहिल्यांदा ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. एक दिवस हे दोनही मित्र बर्गर खात असताना त्यांना ही कल्पना सूचली. ते केवळ कल्पनेमध्येच अडकले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात केली. त्यांनी यासाठी मार्केट रिसर्च केले, तसेच प्रत्येक ब्रँडच्या बर्गरची टेस्ट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या घरीच बर्गर फार्म नावाने बर्गर बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे मनुष्यबळ नव्हते. या मित्रांचे आई वडील त्यांना कामात मदत करत असत. आज त्यांच्याकडे 200 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.
वर्षाकाठी 25 कोटी रुपयांचा टर्नओव्हर
सुरुवातीला दोघांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या बर्गर फॉर्ममध्ये आज तब्बल दोनशे पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. एकट्या जयपूरमध्ये या बर्गर फार्मच्या 12 शाखा आहेत. याशिवाय जोधपूर, कोटा आणि श्रीगंगानगरमध्ये देखील या बर्गर फार्मची प्रत्येकी एक-एक शाखा आहे. भारतीय मसाल्यापासून बनवलेले बर्गर हीच त्यांच्या बर्गरची प्रमुख ओळख आहे. जेव्हा हे बर्गरचे दुकान सुरू करण्यात आले त्याच दिवशी पाचशे ऑर्डर मिळाल्या होत्या, आज त्यांना एक आउटलेट्समधून बर्गरच्या दहा हजारांपेक्षा अधिक ऑर्डरस मिळतात अशी माहिती परमवीर सिंह यांनी दिली.