Tomato : देशातील भाजीमंडईत पाकिस्तानसारखी परिस्थिती, 120 रुपये नाही, टोमॅटोचे भाव तर आता..
Tomato : देशातील टोमॅटोच्या किंमतींनी ग्राहक लालबुंद झाला आहे. टोमॅटोच्या किंमती आता हाताबाहेर गेल्या आहेत. तर कांद्याही काही दिवसातच याच वाटेने जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. टोमॅटोने भावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
नवी दिल्ली : टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो प्रत्येक दिवशी नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे किचनचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. इतर भाजीपाला महाग झाला आहे. महागाई सर्वसामान्यांचा पिच्छा पुरवत आहे. काही दिवसातच काद्यांचे भाव पण वधारतील असा दावा करण्यात येत आहे. अर्थात केंद्र सरकारने (Central Government) वेळीच हस्तक्षेप केला नाही तर पाकिस्तानसारखी स्थिती ओढावू शकते. देशात टोमॅटोच्या किंमती 100-120 रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत. पण हा आकडा पण मागे पडला असून टोमॅटोची द्विशतकी वाटचाल सुरु आहे. नव्या किंमतीमुळे ग्राहकाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काय आहे टोमॅटोचे नवीन भाव..
रॉकेट भरारी टोमॅटोच्या किंमतींनी देशात कहर केला आहे. किंमतींनी रॉकेट भरारी घेतली आहे. यापूर्वी देशातील विविध शहरातील बाजारांमध्ये टोमॅटो 100 रुपये किलोवर पोहचला होता. त्यानंतर हा भाव 120 रुपयांवर पोहचला. टोमॅटोने गेल्या पंधरा दिवसात 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. टोमॅटो आता अजून महाग झाला आहे. सर्वाधिक भाव भोपाळमधील भाजी मार्केटमध्ये दिसले. या ठिकाणी किरकोळ टोमॅटोचा भाव गगनाला भिडला आहे .
भाव भिडले गगनाला अवकाळी पाऊस आणि आता मुसळधार पाऊस, तर काही भागात पावसाने दिलेली ओढ यामुळे भाजीपाला महागला आहे. टोमॅटो सर्वाधिक भाव खात आहे. किंमतींना जणू आग लागली आहे. किंमती आकाशाला भिडल्या आहेत. उत्पादन घसरल्याने टोमॅटो भाव खात आहे. प्रत्येक दिवशी दरवाढ होत आहे. ANI च्या अहवालानुसार, भोपाळमधील विठ्ठल मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव पूर्वी 140 रुपये प्रति किलोवर पोहचले आणि नंतर हा भाव 160 रुपये प्रति किलोवर आला. सध्या भारतीय बाजारात दक्षिणेतून टोमॅटोची आवक वाढली आहे. पण भाव गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव 2200-2300 रुपये प्रति कॅरेटवर पोहचले आहेत.
इतर भाजीपाला महागला भोपाळमध्ये टोमॅटोचा भाव 160 रुपये किलोवर पोहचला. तर इतर राज्यात टोमॅटोचा भाव 120-140 रुपयांच्या दरम्यान आहे. टोमॅटोसह कांदा, बटाटे, वांगे, अदरक आणि हिरवी मिरची महागली आहे. मिरची आणि कोशिंबीर काही ठिकाणी 125 रुपये किलोवर पोहचली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारची तयारी केंद्र सरकारने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ग्राहक मंत्रालयाने त्यासाठी कंबर कसली आहे. सध्या नागरीक, अर्थतज्ज्ञ, बाजारातील व्यापारी यांच्याकडून या अडचणीवर मात करण्यासाठी काय उपाय करता येतील, याची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच आयात करण्यावर विचार सुरु आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे.