Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीत होणार दहा टक्के कर्मचाऱ्यांची कपात; वर्क फ्रॉम होमही केले बंद
एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीमधून दहा टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. याबाबत कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
एलन मस्क (Elon Musk) हे सतत चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा मस्क यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. एलन मस्क यांच्या मालकीची कंपनी असलेल्या टेस्लमधून (Tesla) तब्बल दहा टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. गुरुवारी कंपनीच्या वतीने याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर सध्या टेस्लाच्या जगभरातील युनिटमध्ये कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया देखील स्थगित केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच एलन मस्क यांनी वर्क फ्रॉम होम (Work from home) काम सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. आता वर्क फ्रॉम होम संपले आहे. तुम्ही सर्वांनी ऑफीसला या किंवा राजीनामे द्या. आठवड्यातून कमीत कमी 40 तास तुम्ही ऑफीसला आले पाहिजे. जर तुम्ही ऑफीसला येत नसाल तर असे मानले जाईल की तुम्ही राजीनामा दिला आहे, असा मेल कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.
वाहनांबाबत ग्राहकांच्या तक्रारी
एलन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करते. मात्र अलिकडेच टेस्लाच्या काही वाहनांबद्दल तक्रारी समोर आल्या आहेत. या वाहनांना कोणतही कारण नसताना अचानक ब्रेक लागत असल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या होत्या. या तक्रारींचा मोठा फटका हा टेस्लाच्या शेअर्सला बसला असून, शेअर्स दहा टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या टेस्ला कंपनीत एक लाख कर्मचारी काम करतात. यामध्ये टेस्लाच्या इतर सहाय्यक कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. मस्क यांच्या मते महागाई वाढल्यास इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ होऊ शकते. सध्या अमेरिकेत महागाई उच्चस्थरावर आहे. मात्र तरी देखील अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मगणी वाढली असताना देखील टेस्लाने दहा टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला हे विशेष.
शेअर 1150 डॉलरवरून 709 डॉलरवर घसरला
टेस्ला कंपनीकडून ज्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. त्या वाहनांबाबत सध्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यातील प्रमुख तक्रार म्हणजे या वाहनाला आपोआप ब्रेक लागण्याच्या घटना घडत आहेत. तसेच आता कंपनीने वर्क फ्रॉम होम बंद करून, दहा टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कंपनीसंदर्भातील वेगवेळ्या बातम्या समोर येत असल्याने त्याचा मोठा परिणाम हा कंपनीच्या शेअरवर होत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी टेस्लाच्या शेअरचे मूल्य 1150 डॉलर प्रति शेअरवर पोहोचले होते. मात्र त्यामध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने घसरण सुरू असून, सध्या टेस्लाचे शेअर 709 डॉलर प्रति शेअरपर्यंत खाली आले आहेत. अमेरिकेच्या सरकारी नियामक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 750 हून अधिक ग्राहकांनी वाहनांबद्दल तक्रार केली आहे.