Elon Musk Tesla : टेस्लाचा भारतात मांडव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होताच धनकुबेर एलॉन मस्क याला लक्ष्मी दर्शन
Elon Musk Tesla : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचं नाही तर हायड्रोजन आणि इतर वाहनांचं युग येऊ घातलं आहे. त्यातच जगातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत दबदबा असणारी टेस्ला पण लवकरच भारतात दाखल होणार आहे.
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास आग्रहावरुन अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी जगातील धनकुबेर आणि टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क (Elon Musk Tesla) याची भेट घेतली. न्युयॉर्क येथील पॅलेस हॉटेलमध्ये ही भेट झाली. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचं (Electric Vehicle) नाही तर हायड्रोजन आणि इतर वाहनांचं युग येऊ घातलं आहे. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कंपनी लवकरच भारतात एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानांशी भेट घेतल्यानंतर मस्क याने टेस्लाच्या भारतात दाखल होण्याविषयी मोठा दावा केला. टेस्ला लवकरच भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मस्क याने केली. यामुळे जागतिक बाजारातील भारताचा दबदबा वाढल्याचे दिसून येत आहे.
भारतावर जीव जडला एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या मुलाखतीनंतर मस्क मोठे प्रभावित दिसून आले. मस्कने तातडीने भारताला भेट देण्याची घोषणा केली. पुढील वर्षी भारतात येण्याची मस्कने घोषणा केली. भारतात मोठी गुंतवणूक करण्याचे मस्कने स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी जो पाठिंबा दिला, त्याबद्दल त्याने आभार मानले.
टेस्लाची एंट्री, भारतासाठी मोठी संधी टेस्लाने भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा करणे ही भारतासाठी मोठी संधी आहे. चीनचा प्रभाव ओसरत असल्याने जागतिक ब्रँड आता भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. त्यामुळे अनेक जागतिक कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. इलेक्ट्रिक कार आणि स्वंयचलित कार निर्मितीत टेस्लाने आघाडी घेतली आहे. तिचा एक प्रकल्प भारतात येणे म्हणजे येथील तरुणांना आणि मध्यम-लघू कंपन्यांना मोठी संधी असेल. Apple चे सीईओ टीम कुक यांनी भारतात प्रकल्प सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता टेस्ला येऊ घातल्याने भारत अनेक उत्पादनांचं जागतिक हब ठरु शकते.
टेस्लाच्या शेअरची रॉकेट भरारी मंगळवारी एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्युयॉर्क येथील पॅलेस हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीचा लागलीच परिणाम दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारात टेस्लाच्या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. टेस्ला इंकचा शेअर 5.34 टक्के उसळला.
मस्क एकाच दिवसात मालामाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्याच्या श्रीमंतीत मोठी भर पडली. टेस्ला इंकच्या (Tesla Inc) शेअरने मंगळवारी 5.34 टक्क्यांनी मुसंडी मारली. त्यामुळे मस्कची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती 9.95 अब्ज डॉलरने म्हणजे 81,000 कोटी रुपयांनी वाढली. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, एकाच दिवसात मस्क याच्या कंपनीचे शेअर वधारल्याने, त्याची एकूण संपत्ती 243 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांच्यापेक्षा आता मस्क खूप पुढे गेले आहेत. या दोन्ही अब्जाधीशांमध्ये एकूण 46 अब्ज डॉलरचे अंतर आहे.